रविवार, १४ जून, २०१५

माणुस मी .....

माणूस म्हणून जन्मलेला माणूस माणसासाठी जगत असतो आपल्या सिमित आयुष्याला नवे अर्थ लावत असतो मनातल्या लहरींवर स्वार होऊन माणसांच्या समुद्रात पोहत असतो एखाद्या मोठ्या लाटे खाली चिंब चिंब भिजत असतो किनार्‍यावर असतांना तो त्याच लाटेची वाट पहातो इतर लहान लहरी आल्या तरी तिथेच बसून टिपं गाळतो रागावलेल्या माणसालाही सागराकडेच जावं लागतं दुसर्‍या माणसांच्या लहरींनाही आपल्या कवेत घ्यावं लागतं माणसाचा हात धरून चालणारा माणूस मी हरवलेल्या लाटेला शिधणारा माणूस मी खडकावर आदळूनही खिदळणारा माणूस मी बर्फासारखा थंड तरी पिघळणारा माणूस मी क्षितिजावरील आकांशांकडे पोहणारा माणूस मी रोज मावळत्या सूर्यासंगे उगवणारा माणूस मी साभार:मराठीमाती वेब पोट्रल

शुक्रवार, १२ जून, २०१५

गणपतीपुळे _गणेश मंदिर

रत्नागिरी जिल्ह्यावर परमेश्वराचा वरदहस्त आहे. गणपतीपुळे, पावस, आडिवरे, मार्लेश्वर, कसबा, अशी अनेक तीर्थक्षेत्रे रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. सा-या बाजूंनी रत्नागिरी जिल्हा समृद्ध आहे. अगदी तिथल्या माणसांपासून ते निसर्गापर्यंत सारं काही आपलंसं करणारे आहे. कोकणातली माणसं तर त्यांच्या अगत्यासाठी प्रसिद्ध आहेतच, पण निसर्गाच्या कुशीत वसलेलं कोकणदेखील आपल्याला कायमच खुणावत असतं. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. स्वयंभू गणेशाचे हे स्थान अतिशय नयनरम्य व मनाला शांतता देणारे आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ट्यअसे की हे मंदिर समुद्रकिनारी आहे. किनारा आणि मंदिर यातील अंतर फार तर फार पाच मिनिटे असेल. मंदिरातून बाहेर पडल्यावर लगेच आपण किना-यावरच उतरतो. एका बाजूला समुद्र म्हणजे वाळू तर दुस-या बाजूला खडकाळ प्रदेश असे हे अनोखे आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील बाप्पाला आवडणा-या दुर्वा मात्र तिथे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. येथील ४०० वर्षांची गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. सह्याद्री पर्वतातील नैसर्गिक मूर्ती आणि त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळे आहे. गणपतीची मूर्ती स्वयंभू असल्याने त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ कि. मी. लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय दिसतो. देवळासमोरील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा मनमोहक आहे. राहण्यासाठी खोल्या : गणपतीपुळे यथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C.) चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. कसे जावे : मुंबई गोवा महामार्गावर निवली पासून एक रस्ता आहे .रत्नागिरी शहरापासून नेवरे -कोतवडे मार्गे गणपतीपुळे जाण्यासाठी देखील सहज शक्य आहे .गणपतीपुळे देखील मालगुंड पासून जयगड रोड , वरवडे बाजूला जोडलेले आहे . विमान: जवळचे विमानतळ बेळगाव , 299 किमी आहे. रेल्वे : तसेच रेल्वेने देखील पर्यटक रत्नागिरीला उतरून गणपतीपुळ्याला जाऊ शकतात. बस: गणपतीपुळे रत्नागिरीपासून सुमारे ४० कि. मी. लांब आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे थेट बससेवा पुरवते. जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे: गणपतीपुळे समुद्रकिनारा , मालगुंड , पावस , मार्लेश्वर मंदिर आणि धबधबा , डेरवण , परशुराम मंदिर , जयगड किल्ला साभार:गूगल ब्लॉग. संकलन:किरण भालेकर