बुधवार, २६ ऑगस्ट, २०१५

भटकंती 2


नंदुरबार येथून जवळ असलेल्या तोरणमाळ या ठिकाणची सुंदरता काही औरच आहे. तेथील जंगल, डोंगर – दर्‍या, पक्षी, रंगीबेरंगी फुले आपले मन प्रसन्न करून टाकतील यात वादच नाही. नाशिक पुढील चाळीसगावाजवळील पावणादेवी आणि त्या परिसरातील जंगल हे पावसाळ्यात जाण्याजोगे अजून एक ठिकाण होय. तेथे असलेला कण्हेरगड किल्ला आणि केदारेेशर धबधबा पाहण्यासारखा आहे. चिखलदरा हे अमरावतीहून जवळ असणारे आणि विदर्भवासियांचे आवडते ठिकाण. तेथे असणारा गाविलगड किल्ला, किचकदरा इत्यादिसारखी बरीच ठिकाणे पाहण्यासारखी आहेत आणि पावसाळ्यात या हिल स्टेशनची मजा काही न्यारीच असते. चिखलदर्‍याहून जवळच मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. पावसाळ्यातील दाट जंगल अनुभवायचे असेल तर मेळघाटला भेट देण्याशिवाय पर्याय नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पालादेखील पावसाळ्यात भेट देण उत्तम. मंगळवारखेरीज वर्षभरात कधीही ताडोबाला जाता येते आणि पावसाळ्यातील या जंगलाचे वर्णन करण्यास शब्दच नाहीत, पण या सर्वासाठी तीन ते चार दिवस असावेत. सातारा जिल्ह्यात सध्या एका ठिकाणाचे नाव खूप गाजत आहे………. हो……….. बरोबर ओळखलतं……… कास चे पठार. कासचे पठार म्हणजे महाराष्ट्रातीन व्हॅली ऑफ फ्लोवर्स आहे. साधारण सप्टेंबर महिन्यात या पठारावर असंख्य विविधरंगी फुले फुलतात आणि त्याचा आनंद घेण्यासाठी – पाहण्यासाठी हजारो लोक तेथे भेट देतात. कासबरोबरच साता-याजवळ नदीकिनारी आणि जुन्या मंदिरांचा समूह असणार्‍या माहुली या ठिकाणी नक्की भेट दिली पाहिजे. त्याचप्रमाणे अजिंक्यतारा, सज्जनगड देखील मस्तच आणि येथून जवळ असलेल्या ठोसेघर धबधब्याची सुंदरता म्हणजे अप्रतिमच होय. सातारहून ८ कि.मी. असणा-या कण्हेर धरणाला सुद्धा भेट देता येईल. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असणा-या पन्हाळगडावर पावसाळ्यात बरेच जण जातात. पावसाळ्यातील पन्हाळगड आणि परिसर सुंदरच दिसतो पण काही लोकांना तेथे वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर पन्हाळगड ते विशाळगड हा पावसाळी ट्रेक नक्की करावा. ज्या वाटेने छत्रपती शिवराय पन्हाळगडाच्या वेढ्याला चकमा देऊन विशाळगडाकडे गेले आणि ज्या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या पावनखिंडीहून हा ट्रेक जातो. मसाईचे विस्तीर्ण पठार, शेती, जंगल, ओढे, नदी, नाले, छोटी छोटी गावे अशा ठिकाणांहून हा ट्रेक पूर्ण होतो. ज्यांना पावसाळी थ्रिलिंग अनुभवायचे आहे त्यांना हा ट्रेक म्हणजे पर्वणीच. हा ट्रेक आयुष्यात एकदा तरी करायालाच हवा. मुंबई येथील भरारी गिर्यारोहण संस्था हा ट्रेक गेली १२ वर्षे यशस्वीरित्या आयोजित करते आहे. त्याच प्रमाणे विशाळगडाजवळ असणारा गजापूर ते आंबा आणि आंबा ते साखरपा हा घाटरस्तादेखील धमाल देऊन जातो. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणा-या वाटेवर वरंधाघाट लागतो. वरंधाघाटा लगतच कावळ्या नामक किल्ल्याला देखील जाऊ शकतो. पावसाळ्य ात वरंधाघाटाला जाणे म्हणजे एक जबरदस्त अनुभव आहे. डोंगरातून वाहणारे छोटे मोठे झरे, धबधबे, बाजूला खोल दरी आणि त्या दरीत दिसणार छोटास गाव, आणि त्या गावालगत वाहणारी नदी असे वेड लावणार सौंदर्य वरंधाघाटात आहे. वरंधा घाट उतरल्यावर समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य लाभलेले शिवथरघळ येथील गुहा आणि त्या गुहेबाहेर पडणारा पाऊस – धबधबा पाहणे म्हणजे क्या बात है…… महाराष्ट्रात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी काही ठिकाण आहेत की जिथे आपण गुहेच्या आत असतो आणि गुहेबाहेर समोरून पाणी पडत असते. शिवथरघळ हे त्यातील एक ठिकाण आहे. निसर्ग संपन्न असणारे कोंकण पावसाळ्यात अजून सुंदर दिसू लागते. उंच हिरवेगार डोंगर, दुथडी भरून वाहणा-या नद्या, खवळलेला समुद्र, लांबवर पसरलेली हिरवीगार भातशेती आणि शेतीच्या कामाची लगबग असणारी कोंकणातील भोळी भाबडी माणस आणि या सर्वाबरोबर पावसाळ्यातील कोंकण म्हणजे मज्जाच. छत्रपती शिवरायांचे राजधानीचे ठिकाण म्हणजे रायगड. पावसाळ्यात रायगडला जाणे म्हणजे वा…….. ह….. असे म्हणतात की, पावसाळ्यातील रायगड एकदातरी अनुभवा. जे लोक इतर अनेकवेळा रायगडावर गेले आहेत आणि जे लोक पावसाळ्यात गेले आहेत ते या म्हणण्याशी नक्कीच सहमत असतील. साभार :गूगल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा