शनिवार, २५ मार्च, २०१७

आम्ही सह्यवेडे,दुर्गवेडे

भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजीन रायगडा
तुमच्या अमुच्या गंगा यमुना केवळ माझी भिंवरथडी
प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हांला, बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते तुकयाचा आधार मला
धिक तुमचे स्वर्गही साती
इथली चुंबीन मी माती
या मातीचे कण लोहाचे, त्रुणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातून अजुनी वाहतसे लाव्हा सगळा

कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परी माझाच
जयदेवाचा जय बोला परी माझा नाम्याचा नाच
जनीं जनार्दन बघणारा तो "एका" हृदयी एकवटे
जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला खूण पटे
इंद्रायणीच्या डोहामधली गाथा ओली ती ओली
ती माझी मी तिचाच ऐसी; जवळीक कायमची झाली
भक्तीचा मेळा दाटे
चोख्याची पैरण फाटे
निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले
माझ्यासाठी भीमाकांठी भावभक्तीची पेठ खुले

रामायण तर तुमचें अमुचे भारत भारतवर्षाचें
छत्रपतींची वीरकहाणी निधान माझ्या हर्षाचें
रजपुतांची विक्रमगाथा तुमच्यापरी मजला रुचते
हृदयाच्या हृदयांत; परंतू बाजी बाजीची सुचते
अभिमन्युचा अवतारच तो होता माझा जनकोजी
दत्ताजीचा शेवटचा तो शब्द अजुन हृदयामाजीं
बच जाये तो और लढे
पाउल राहील सदा पुढे
तुम्हास तुमचें रुसवेफुगवे घ्या सगळा नाजुक नखरा
माझ्यासाठी; राहील गांठी; मराठ्यांचा हट्ट खरा

तुमचेंमाझें ख्यालतराणे दोघेही ऐकू गझला
होनाजीची सोनलावणी वेड लावते; परी मजला
मृदुंग मोठा सुमधुर बोले, मंजुळ वीणा अन मुरली
थाप डफावर कडकडतां परी बाही माझी फुरफुरली
कडाडणारा बोल खडा जो दरी-दरीमधुनी घुमला
उघडुनी माझ्या हृदयकवाडा तोच पवाडा दुमदुमला
तटातटा तुटती बंद
भिंवईवर चढते धुंद
औट हात देहांत अचानक वादळ घुसमटुनी जातें
उचंबळे हृदयात पुन्हा तें इतिहासशी दृढ नातें

कळे मला काळाचे पाउल द्रुतवेगानें पुढती पडे
कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणी अधिकची उघडे
दहा दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी
मीही माझें बाहू पसरून अवघ्या विश्वातें कवळी
विशाल दारे माझ्या घरची, खुशाल हीं राहोत खुली
मज गरीबाची कांबळ वाकळ सकळांसाठी आंथरली
मात्र भाबडया हृदयांत
तेवत आहे जी ज्योत
ती विझवाया पहाल कोणी मुक्त करून झंझावात
कोटी कोटी छात्यांचा येथे कोट उभारू निमिषांत

होळी उत्सव -2017

https://youtu.be/yoBsdQnhBT8

मंगळवार, २१ मार्च, २०१७

कलावंतीण सुळका व किल्ले प्रबळगड ..

   कलावंतीण सुळका व किल्ले प्रबळगड
    " ट्रेकींगचे भूत एकदा का मानगूटीवर बसले कि ते कोणत्याही बाबाकडून उतरले जात नाही त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे सर्व ट्रेकर्स जातीचा लाडका सखा सह्याद्री होय.अफाट दर्याचा सिंधुसागर व उत्तुंग असा हिमालय पर्वत देखील ज्याच्या रांगडेपणापुढे मान तुकवतो तोच हा अतीप्राचीन सह्याद्री पर्वत होय.पृथ्वी आणि स्वर्ग यांच्या मिलनातुन सह्याद्रीची निर्मिती झाली अशी आख्यायिका ऐकायला मिळते.सर्व हाडाच्या डोंगरभटक्यांना,दुर्गप्रेमी आणि सह्याद्री पर्वताच्या नादाने वेडे झालेल्या माझ्या सर्व ट्रेकर्सरुपी साधू-संतांना मानाचा मुजरा करून हि ट्रेकस्टोरी हाती घेतो आहे..
     नवीन वर्ष उजाडले तेच मुळात दुर्गदुर्गेश्वर रायगडाच्या पवित्र दर्शनाने...छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन जास्तीत जास्त गडकोटांचे दर्शन घेईन असा संकल्प सोडला होता.नव्या वर्षाची अशी आश्वासक सुरुवात झाली होती.लगेच दुसऱ्या महिन्यात किल्ले अर्नाळा व कळम बीच वैगरे फिरून झाले.मार्च महिन्याने उन्हाचा पारा वाढत असल्याची चाहूल दिली पण त्याची पर्वा कोणाला होती?
ट्रेकींगचे किडे एकदा डोक्यात वळवळायला लागले मग ऊन-वारा-पाऊस सर्व काही विसरून जायला होते.ओढ लागलेली असते फक्त त्या गूढ सह्याद्रीची....नेहमी माझ्या भेटीला येणारा हा सह्यवेडा अजून कसा आला नाही म्हणून तो सुद्धा गहन विचारात पडला असावा ?
     शनिवारी दि.11 मार्च दिवसभर कर्नाळा किल्ला व पक्षी अभयारण्य / कलावंतीण व किल्ले प्रबळगड या दोन ठिकाणांवर काथ्याकुट झाला शेवटी संध्याकाळी कलावंतीण व प्रबळ हा सोलो ट्रेक करण्यावर शिक्कामोर्तब झाले.ट्रेकचे संपूर्ण नियोजन करून रात्री बॅग पॅक केल्या.कठीण श्रेणीचीे हि दोन्ही ठिकाणे असल्यामुळे नवखे न घेता आम्ही दोघेच ट्रेकला निघालो.अजिंक्य सोबतीला होताच.ट्रेकला ज्या दिवशी जायचे असेल त्याच्या आदल्या रात्री झोप लवकर लागत नाही हा माझा अनुभव आहे.12 मार्च रविवार सकाळी 3.00Am चा अलार्म झाला आणि मी डोळे चोळत जागा झालो.बऱ्याच दिवसांनी सकाळी लवकर उठण्याचा विक्रम माझ्या नावावर झाला होता.कोमट पाण्याने अंघोळ उरकून एकदाचे 3.40Amला आम्ही घराबाहेर पडलो.स्टेशनपर्यंत रिक्षा मारली.4.06Amची चर्चगेट गाडी पकडली व दादर स्टेशनला 4.50ला पोचलो.दादर वरून आम्हाला कुर्ला हार्बर लाईन प्लॅटफॉर्म गाठायचा होता.कुर्ला वरून 5.07Amची पनवेल लोकल पकडली.एवढ्या लवकर सुद्धा गाडीला गर्दी होती.कशीबशी सीट मिळवून ताणून दिले.या लाईनवरच्या गाड्यांचा वेग बऱ्यापैकी म्हणजे 60kmph असतो.नाहीतर वेस्टर्न रेल्वे 2 किमी पळवायला 10 मिनिटे वेळ घेते.तासाभरात म्हणजे बरोबर 6.00 वाजता पनवेल स्टेशनला पोचलो.पनवेल स्टेशनच्या बाहेर नाश्ता घेऊन बसलेले काका दिसले.गरमागरम कांदेपोहे आणि शिरा....
काय नशीब काढले होते दिवस आमचाच होता.
रस्त्याने चालताना काका भेटले त्यांची होळी ऐन रंगात होती त्यांनी नौटाक मारायला पैसे मागितले त्यांना खुश केले.परत ट्रेनमध्ये तृतीयपंथीयांना कधी नव्हे ते पैसे दिले.असे दोन-चार जणांचे आशीर्वाद घेऊन निघालो.ट्रेकमध्ये कोणतीही विघ्ने येऊ नयेत एवढीच निव्वळ भावना होती.पनवेल बस डेपोला चौकशी केली असता 6.55Am ची ठाकूरवाडी बस आहे असे समजले.तोपर्यंत चहा-पेपरची तलफ भागवून डबा टाकून आलो.तेवढ्यात लाल डबा हजर झाला.ठाकूरवाडी बोर्ड बघून आमचा जीव भांड्यात पडला.पहिलीच जागा पटकावली पाठीमागे पाहतोय तर आमच्यासारखेच दोन उडाणटप्पू पाठच्या सीटवर बसलेले जयेश बेहरा (Treks and Travel-ब्लॉगर)व त्याचा मित्र प्रतीक पाटील.दोघेही तिकडेच निघाले होते.आमचा आनंद अशा प्रकारे द्विगुणीत झाला.
      खूप दिवसांनी एक सुंदर सकाळ अनुभवत होतो.डोंगराच्या आडून लपाछपीचा खेळ खेळनारा सूर्यनारायण आणि त्याची तांबूस कोवळी किरणे,अंगाला झोंबणारा गार वारा,बसने पकडलेला भन्नाट वेग,लांबवर पसरलेली भाताची खाचरे,मागे पडत जाणारे डोंगर,कौलारू घरे हे सर्व पाहताना कोकणात आल्याचा भास झाला.ते तुझं घर गेले हे माझे घर आले अशा आमच्या मनसोक्त गप्पा चालू होत्या.8.00Amला झोया हेल्थ रिसॉर्ट/स्पा रिसॉर्ट आहे तिकडे उतरलो.ड्रायव्हर काकांना धन्यवाद दिले आणि खऱ्या अर्थाने ट्रेकचा श्रीगणेशा केला.डाव्या हाताने जाणाऱ्या रस्ताने निघालो.इथून पुढे 5 मिनिटावर एक लोखंडी बोर्ड व छोटा पूल लागतो.कलावंतीण व प्रबळगडाचा v आकाराचा शेप इथून स्पष्ट दिसतो.या शेपच्या डाव्या बाजूला कलावंतीण सुळका व उजव्या बाजूला प्रबळगड आहे.डांबरी मार्गाने चढ चढून गेले की वडाचे एक मोठे झाड लागते.या झाडाच्या उजव्या हाताला एक मळलेली लाल मातीची पायवाट जंगलात गेली आहे हाच माचीप्रबळ गावात जाण्याचा मुख्य रस्ता आहे.चालताना माहीमकर आडनावाचे सद्गृहस्थ भेटले.वय वर्ष 65.आतापर्यंत 18 वेळा कलावंतीण ट्रेक केलेला माणूस त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारत निघालो.वाटेत दोन-चार खिंडीवजा शॉर्टकट लागतात.इथून काळजीपूर्वक वरती चढल्यास अर्ध्या तासामध्ये दोन ते तीन पायऱ्या आढळतात.दगडात कोरलेले शेंदूर लावलेले हनुमान आणि गणपती यांच्या मुर्त्या दिसतात. इथून सरळ पुढे गेल्यावर आपण माचीप्रबळ या छोट्याशा गावाच्या पठारावर पोचतो.या गावात जेवण,राहणे,टेंट यांसारख्या सुविधा अल्पदरात मिळतात.पाण्याची मात्र गावात कमतरता आहे. पैसे देऊनच पाणी खरेदी करावे लागते.
पठारावर थोडीशी विश्रांती घेऊन नजरेसमोर दिसणाऱ्या घराच्या उजव्या बाजूने जाणाऱ्या पायवाटेने आम्ही कलावंतीण सुळक्यासाठी निघालो.
       कलावंतीण सुळका या ट्रेकची सर्व नेटकऱ्यांनी नवख्या लोकांना भीती घालून ठेवली आहे.ज्या लोकांच्या शरीराच्या मापात पाप नाही अशा लोकांनी हा ट्रेक करायला हरकत नाही.छोट्या छोट्या टप्पाचे रॉकपॅच चढताना थोडीफार दमछाक होते.काळ्या कातळात अखंड कोरलेल्या व उभ्या-आडव्या चढणीच्या पायऱ्या हे या सुळक्याचे प्रमुख आकर्षण आहे.कातळारोहणाचे हे एक दोन टप्पे पार केल्यावर सोबत आणलेले काकडी,गाजर,पेपरमीट यांचा फन्ना उडवताना धमाल आली.5 मिनिटे आराम करून पुन्हा निघालो. शेवटचा रॉकपॅच थोडा कठीण आहे.
कलावंतीण सुळक्याचा माथा खूप छोटा आहे.वरून दिसणारे किल्ले न्याहाळताना मजा येते.कल्याणचा प्रसिद्ध हाजीमलंगगड, माथेरान प्रवेशद्वार पेब/विकटगड,रसायनी परिसर,इर्शालगड,किल्ले कर्नाळा यांचे दर्शन होते.सुळक्यावर गेल्यावर छ्त्रपती शिवरायांची गारद(शिवगर्जना) देण्यात आली.फोटो वैगरे काढून झाल्यावर थोडा आराम करून आम्ही परत उतरायला चालू केले.शरीराचा तोल सांभाळून व पायावर नियंत्रण ठेवून काळजी घेऊन उतरावे लागते.अनेक लोक उतरताना केविलवाणे चेहरे करून बसले होते त्यांना उतरताना कोणती काळजी घ्यावी ते सांगून व्यवस्थीत खाली उतरविले.व आम्ही वेगाने प्रबळगडाकडे वळलो.उतरताना मोकळ्या पठारावर डाव्या बाजूला जाणारी पायवाट स्पष्टपणे नजरेस पडते.त्या पायवाटेवरून आम्ही चालू लागलो.10 मिनिटे चालल्यावर डाव्या बाजूला जो फाटा फुटला आहे तिथे एक झोपडी आहे.लिंबूपाण्याची कायमस्वरूपी सोय तिथे आहे.हिच वाट दरीच्या तोंडातून सरळ  प्रबळगडाकडे गेली आहे.मुख्य वाटेवर आल्यावर झाडांची सावली बघून जेवणासाठी पथारी पसरली.एव्हाना दुपारचे 11 वाजून 40 मिनिटे झाली होती.सर्वाना जाम भुका लागल्या होत्या.घरून बनवून आणलेले मेथीपराठे,टोमॅटो सॉस, मॅगी,आमलेट-चपाती अशा सर्वांच्या पुड्यांमध्ये काहीतरी वेगळे होते.वनभोजनाची गंमत जंगलात एकांतात जेवल्याशिवाय कळत नाही म्हणतात तेच खरे ...!
जेवणावर असा आडवा हात मारुन झाल्यावर हिरव्यागर्द सावलीत पाय पसरले.आमच्याकडे आता शिल्लक राहिलेले सामान म्हणजे 3.50 लिटर पाणी,संत्रे,मोसंबी,लिंबू सरबताचे सामान,3 बिस्कीट पुडे,आणि जड झालेल्या बॅगा...
हे सर्व घेऊन 12.30Pmला प्रबळगडाकडे कूच केली.
     प्रबळगड हा नावाप्रमाणेच चढाईला प्रबळ व दमछाक करणारा आहे.खड्या चढणीची,कड्यापासून विलग झालेली,प्रचंड घसाऱ्याची व ओढ्यातील छोट्यामोठ्या दगडांतून जाणारी निमुळती होत गेलेली वाट आहे.जवळच पुन्हा एक झोपडी आहे.झोपडीजवळून कड्याला बिलगून डाव्या  बाजूला जाणारी वाट आपल्याला एका छोट्या गुहेत घेऊन जाते.तर समोरची वाट किल्ल्यावर घेऊन जाते.वेळ कमी असल्याने तिकडे जाणे टाळले.दगडाची चाचपणी करूनच त्यावर पाय टाकणे योग्य ठरते.नाहीतर पाठीमागून येणाऱ्या लोकांवर ते गडगडत जायचे आणि त्यांना मोक्ष मिळायचा.पुरेपूर काळजी घेऊनच हि वाट चढावी लागते.अंतर कमी असले तरी चढाई थकवणारी आहे.पाऊण तासाने आपण गडाच्या पठारावर पोचतो.इकडे शिवसह्याद्री दुर्गसंवर्धन संस्थेने बोर्ड लावला आहे.इथे आपल्याला दोन वाटा फुटलेल्या दिसतात.डावीकडे म्हणजेच कलावंतीण पॉईंटकडे जाणारी वाट आम्ही निवडली.गावाकडच्या देवराईत किंवा शिकारीला जाताना जसे गर्द जंगल असते तसे जंगल प्रबळगडावर अनुभवयास मिळाले.चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडत होता.झाडांच्या सावलीतून चालताना मिळणारा थंडावा सारा थकवा घालवत होता.दहा मिनिटांनी आपण कलावंतीण पॉईंटवर पोचतो.प्रबळगडाच्या या पॉईंटवरून कलावंतीण सुळक्याचे जे मनमोहक दृश्य दिसते ते शब्दात पकडणे कठीण आहे.त्याची प्रत्यक्षात अनुभूती घेतली पाहिजे.केलेल्या सर्व भटकंतीचे सार्थक या एका ठिकाणी होते.इथे येईपर्यंत दुपारचा एक  वाजला होता.
    बोर्ड जवळून गेलेली उजवीकडची वाट आपल्याला गणेश मंदिर,पाण्याची टाक,काला बुरुज,चुन्याचा ढीग याकडे घेऊन जाते.पण हे अंतर बरेच लांब असल्यामुळे कमीत कमी दोन दिवसाचा वेळ काढून येथे यावे लागेल म्हणून आम्ही ते प्रकर्षाने टाळले.प्रबळगडावर घनदाट जंगल असल्यामुळे माहितगाराशिवाय पुढे जाणे धोक्याचे ठरू शकते.वेळ कमी असल्यामुळे आम्ही गड उतरायला सुरुवात केली.वाट निसरडी असल्यामुळे वेळ घेऊन सावकाश उतरावे लागते.तासाभरात पहिल्या झोपडीजवळ पोचलो.लिंबूसरबताची फर्माईश पूर्ण करून थोडा आराम करून पुन्हा उतरायला चालू केले.कलावंतीण सुळका व प्रबळगडाचा जड अंतःकरणाने निरोप घेतला.3.30pm ला रिसॉर्टच्या बस थांब्याजवळ पोचलो.पनवेलला जाणारी बस 4.00Pm वाजता येते हे कळल्यावर पुन्हा एकदा उरल्यासुरल्या पुड्या सोडल्या.बरोबर चार वाजता बस आली.बसमध्ये लिंबू सरबत बनवून पिण्याचा आगळावेगळा कार्यक्रम आम्ही पार पाडला.फोटोंची देवाणघेवाण उरकुन एक झोप काढली.तोपर्यंत पनवेल स्टेशन आले.दोन्ही नव्या मित्रांना निरोप देऊन 5.28pm (पनवेल-अंधेरी) गाडी पकडली.अंधेरी-मालाड करत एकदाचे 7.30Pmला घरी पोचलो.
   सह्याद्री जगण्याचे बळ देतो असे म्हणतात.मुंबईतील रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक दिवस स्वतःसाठी जगायलाच पाहिजे.सह्याद्रीकडून,निसर्गाकडून एक नवीन ऊर्जा घेऊन आम्ही घराकडे परतत असतो.या ट्रेकमुळे सह्याद्री खऱ्या अर्थाने जगल्यासारखा वाटला.पावसाळ्यात सर्व मित्रमंडळींना या ट्रेकला घेऊन जाण्याचे नक्की आहे.
           अजून काय लिहू ..
         ||   मर्यादेय विराजते ||    
                        किरण प्रकाश भालेकर
            Bhalekar117.blogspot.com
            Facebook.com/bhalekar117
            Bhalekar117@gmail.com





















कलावंतीण सुळका




































































































सोमवार, ६ मार्च, २०१७

वीरगळ

असे दगड कोरण्याची पद्धत मूळ कर्नाटक / आंध्रप्रदेशातून आली असावी असे अभ्यासकांचे मत आहे.

याला वीरगळ असे म्हणतात वीर म्हणजे जो लढाई करतो अथवा आपल्या लोकांचे संरक्षण करतो अशी व्यक्ती आणि गळ म्हणजे दगड. असे दोन शब्द मिळून वीरगळ हा शब्द तयार झाला.

एखाद्या व्यक्तीला  लढाई करताना अथवा गावाची रक्षा करताना अथवा गुरांचे संरक्षण करताना वीरमरण आले तर त्याची आठवण म्हणून कोरलेला दगड होय. विरगळ हि मुख्यतः ४ भागात विभागलेली असते.

१ :- सूर्य आणि चंद्र - वीरगळीच्या सर्वात वरच्या भागात एका बाजूला सूर्य आणि दुसऱ्या बाजूला चंद्र कोरलेले असते, याचा अर्थ या वीराची कीर्ती सूर्य - चंद्र असे पर्यंत राहील.

२ :- शिवपिंड व नंदीची पूजा - याचे संशोधक दोन अर्थ सांगतात  (i)  वीरमरण आलेली व्यक्ती कैलासात जाऊन शंकराची आराधना करत आहे. ( ii ) वीरमरण आलेली व्यक्ती हि शैव पंथाची होती.

३ :- लढाई - या भागामध्ये वीर लढाई करताना दाखवलेले असते. यात मुख्यत्वे वीर लढाई करताना दाखवले असते तसेच  कोणाशी लढत होता त्याचे शस्त्र कोणते होते हे दाखवलेले असते. बऱ्याच वीरगळींमधे या भागात वेगळेपण आढळतो वीराच्या हातात काही ठिकाणी भाला , तलवार . धनुष्य-बाण तर काही ठिकाणी वीर घोड्यावर बसलेला दाखवण्यात आला आहे.

काही ठिकाणच्या वीरगळींमधे बैलाची चिन्हे कोरलेली आहेत याचा अर्थ हा वीर गावातील गुरांचे रक्षण करताना धारातीर्थी पडली आसा होतो

४ :- वीरमरण - या भागामध्ये वीर हा धारातीर्थी पडलेला दाखवलेला असतो.

राज बलशेटवार मावळ तालुका
सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र

रविवार, ५ मार्च, २०१७

राजकारण कि निव्वळ अर्थकारण......????

#रोखठोक

राजकारण म्हणजे फक्त पैसाकारण ...
" पैसे वाटा सीट जिंका " हे नव्या राजकारणाचे नवे ब्रीदवाक्य झाले आहे.राजकारण हा फक्त धनदांडग्या लोकांचा अड्डा आहे हे पुन्हा एकदा निर्विवाद सिद्ध झाले.सर्वसामान्य लोकांचा मात्र या घाणेरडया खेळात जीव जातो.
ज्यांना जनता कालपर्यंत ओळखतसुद्धा   न्हवती ते आज नगरसेवक झाले. पक्षनिष्ठा,निष्ठावंत,कडवट,कटटर असे शब्द ऐकले कि आता भीती वाटायला लागते.कारण त्या शब्दांचे महत्त्व आता फुटक्या कवडी इतकेही नाही.परिवर्तन होणार म्हणजे नक्की काय होणार?
त्याचा अर्थ आता नव्याने समजू लागला आहे.जे विभागातील नागरिकांना ओळखतही नाहीत ते आता विकासाची गंगा घरोघरी आणणार.

     ज्यांनी प्रामाणिकपणे जनतेची कामे केली त्यांना जनतेनेच दूर लोटले.कशासाठी तर हजार_दोन हजार रूपडयांसाठी...!!
" मतदारराजा जागा हो लोकशाहिचा तू धागा हो " मतदारराजा दोन हजार रुपये घेवुन एका दिवसापुरता जागा झाला.आता पुढील पाच वर्ष तो मांजराप्रमाणे डोळे मिटून सारे कर भरणार,महागाई ओढुनताणुन सहन करणार पण तोंडातुन चकार शब्द काढणार नाही.

निवडणुकीच्या काळातले कौरव_पांडव सुद्धा आता गळ्यात गळे घालून हे राज्य तूम्ही चालवा; ते राज्य मी चालवतो असे अतिशय समजुतीने संसाराच्या वाटण्या करतील.
महाभारतात यूधीष्ठर पांडवांसाठी फक्त पाच गावे मागत होता परंतु दुर्योधन सुईच्या अग्रभागाइतकी जमीन पांडवांना दयायला तयार झाला नाही त्यामुळे महाभारत घडले.पण आताचे राज्यकर्ते इतिहासातून समजुतदारपणा घ्यायला शिकले.त्यांना मुळात महाभारत करायचेच नाही आहे.सत्ता गेली तर हाती धुपाटणे घेण्याशिवाय गत्यंतर नाही.निवडणुकीपुरते दहा दिवस गल्लीबोळ पिंजून काढतात ते परवडले नाहीतर रोजच फिरावे लागेल...
हि सर्व नेतेमंडळी इतकी शहाणी असतील तर त्यातील एक टक्का शहाणपण आपल्या मतदारांकडे का नाही...
                    
                             किरण भालेकर

गुरुवार, २ मार्च, २०१७

मुंबईतील कोकणी माणूस....

#मुंबईतील_कोकणी_माणूस
#चाकरमानी
मुंबईत मे महिन्याचा अंगाला झोंबणारा उकाडा चालु झाला कि इथे राहणाऱ्या कोकणकरांना आपल्या गावातील कौलारु घराची आठवण आल्याशिवाय राहत नाही. गावच्या ओढीने पावले आपोआप गावाच्या दिशेने म्हणजेच जन्मभूमीकडे वळु लागतात.नदी जशी सागराच्या मिलनाच्या ओढीने वेगात वाहते तशीच काहीशी अवस्था मुंबईत राहणाऱ्या कोकणकरांची झालेली असते.कधी एकदा आपले गावचे घर गाठून पथारी पसरतोय  असे होते.कोकणातील कौलारु घरात मिळणारी वार्याची थंड झुळुक प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते.गावची स्वछ ताजी हवा मन अगदी प्रसन्न करणारी असते.मुंबईत काम करणारे हे कोकणकर कौतुकाने गावाकडे (चाकरमानी) या नावाने ओळखले जाते.असे हे चाकरमानी आपला दहा दिवसांचा संसार बोचक्यात गुंडाळून कोकणच्या प्रवासाला निघतात.
     कोकणात जाण्यासाठी सर्वाधीक पसंतीचा मार्ग म्हणजे कोकणकरांची अभिमान असणारी कोकण रेल्वे होय. कोकण रेल्वेचा हा खडतर मार्ग जगप्रसीद्ध आहे.याच मार्गावर रत्नागिरी जवळील दुर्गम अशा करबुडे येथे ६  किलोमीटर लांबीचा आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा आहे तर आशियातील सर्वात उंच पुल (रेल्वे) पानवल येथे आहे.याची ऊंची ६५ मीटर इतकी आहे. डोंगरातून रेल्वे धावेल ही अशक्य कल्पना भारतीयांनी शक्य करून दाखविली आहे. २ महीने अगोदरच रेल्वेची आरक्षीत तिकीटे काढली जातात. हे १० दिवस कोकण रेल्वे गर्दीने फुलुन गेलेली असते.प्लेटफॉर्मवर नजर जाईल तिकडे फक्त चाकरमानी दिसतील.कोकणात जाण्याचा दूसरा मार्ग म्हणजे रस्ते वाहतूक.यामध्ये सर्वाधिक पसंती S.T ला असते.सुरक्षीत प्रवासासाठी राज्य महामंडळाची S.T ओळखली जाते.तर काहीजण आपल्या स्वताच्या वाहनाने गावी जाणे पसंत करतात.
     कोकणावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे.इथला शेतकरी पूर्णतः निसर्गचक्रावर अवलंबून असतो. कोकणचा हापुस आंबा हा जगप्रसिद्व आहे.तसेच कोकणात आंब्याच्या पायरी ,तोतापुरी,रायवळ,भोपळी अशा  कितीतरी जाती आढळतात.रायवळ आंबे कोकणात विपुल प्रमाणात आहेत.याबरोबरीने फणस,काजू,जांभूळ,करवंदे,चीकू,रातांबे असा हा कोकणचा मेवा मे महिन्यामध्ये तयार होऊन चाकरमान्यांच्या भेटीची आतुरतेने वाट पहात असतो.
     वर्षभर बंद असणारी गावातील सर्व घरे यनिमित्ताने का होईना गजबजुन जातात.घराला या दहा दिवसांत घरपण येते.लहानग्यांची छोटी छोटी पावले इथल्या मातीशी एकरूप होऊन जातात.कोकणी माणूस होळी गणपती उस्तव या प्रमुख सणांबरोबर मे महिन्यातही गावात आपली उपस्थिती दर्शवितो.गावातील गावकरी व मुंबईकर यांमध्ये एकोपा वाढीस लागून बंधूभावाची भावना निर्माण होण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजीत केले जातात.यामध्ये सर्वांच्या सुखासाठी गावच्या/वाडीच्या महापूजेचे आयोजन केले जाते.महाप्रसाद तयार करण्यात येतो.सर्वजण एकत्र येवून गावच्या विकासासाठी देवाला साकडे घालतात. रात्री आरती भजन कीर्तन नमन नाटक जाखडी अशा  कोकणच्या पारंपारिक लोककला सादर केल्या जातात. गावाकडे परतल्यावर चाकरमानी गावातीलच एक होऊन जातो. गावातील जुने सवंगडी,शेजारी ,पाहुणे यांच्या भेटी घेण्यात तो रममाण होतो.गावाशी असलेलेली त्याची नाळ यनिमित्ताने अधिक घट्ट होते.
    मे महीना हा लग्नसरायांचा हक्काचा असा काळ होय.कोकणी माणूस वर्षभर अगोदर लग्न ठरवुन गावी लग्नसमारंभ करणे पसंत करतो.गावामध्ये लग्ने,हळदी ,पूजा यांचीच धामधुम असते.गावातील सर्वांचे मानपान करण्यात यजमान मंडळी अगदी थकुन जातात.
       कोकणी माणसाची देवावर अमाप श्रद्धा आहे. याला तुम्ही देवभोळेपणा असे म्हटलात तरी चालेल.पण कोकणी माणूस आपल्या गावच्या ग्रामदेवतेच्या उस्तवाला आवर्जून हजेरी लावणारच. मुंबईसारख्या आधुनिक सुखसोयीनी यूक्त असणाऱ्या शहरात राहुनही कोकणी माणूस आपल्या संस्कृतीला विसरलेला नाही. आपल्या गावाला विसरलेला नाही.म्हणूनच मला खुप अभिमान वाटतो कि मी सुद्धा एक सच्चा कोकणी माणूस आहे.
        
                                  लेखक
                             किरण भालेकर  
                       लांजा,गोळवशी,खांबडवाडी

माझ्याविषयी

आयुष्यातील प्रत्येक क्षण नं क्षण जगणारा मी एक माणूस आहे.वाईटातुनसुद्धा चांगले शोधण्याचा आणि सत्याची कास धरतच अपेक्षीत उंची गाठली पाहिजे या मताचा मी आहे.माझ्यामते आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे सुखदुःखांचा,चांगल्यावाईट प्रसंगांचा...
या प्रवासाला सामोरे जाण्याची आपली तयारी असली पाहिजे.प्रत्येक नव्या वाटेवर मार्गदर्शक भेटेलंच असे नाही. आपल्या वाटा आपणच प्रकाशमान केल्या पाहिजेत.
  मला वेगवेगळ्या विषयांवरती लिखाणातुन व्यक्त व्हायला आवडते.लेखणीच्या सामर्थ्यावर माझा विश्वास आहे.
भटकंती,ट्रेकिंग,सह्याद्री,गडकोट,लेणी, सुवर्ण कोकण,प्राचीन संस्कृती,मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास,वाचन या सर्वांची मला खूप आवड आहे.मराठी सण, साहित्य, परंपरा मला प्रचंड भावतात. मी महाराष्ट्राचा आणि मराठी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्य यांची माहिती पुढील पिढीला करून देणे हे माझे कर्तव्य आहे.महाराजांच्या विचारांचा पाईक होण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन.
                II मर्यादेय विराजते II
                                      किरण प्रकाश भालेकर
                       Bhalekar117.blogspot.com
                       Bhalekar117.wordpress.com
                       Bhalekar117.tumblr.com
                       Facebook.com/bhalekar117