रविवार, २ ऑक्टोबर, २०१६

गोळवशी_माझं_गांव (भाग 2)

गोळवशी_माझं_गांव  (भाग 2)


रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यापासून ११ किमीवर वसलेले हे एक खेडेगाव होय.कोकणातील ईतर गावांप्रमाणेच या गावावर सुद्धा निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे.चारही बाजुंनी पसरलेल्या डोंगररांगा,घनदाट जंगले,त्यात दाटीवाटीने वसलेली कौलारु घरे,मुचकुंदी नदीचे खळाळत वाहणारे पात्र गावाच्या वैभवात अजुन भर टाकते.
विशाळगडच्या पायथ्याला उगम पावलेली मुचकुंदी माईचा गावाला सहवास लाभला आहे.मुचकुंद ऋषींच्या तपाचरणाने पावन झालेली हि नदी यामुळेच या नदीला मूचकुंदी असे नाव पडले.पुढे ही नदी पूर्णगडच्या खाडीला जाऊन मिळते.गावाच्या सीमेलगत वाहणारी हि नदी पार केल्यास आपण राजापुर तालुक्यातील हसोळ या गावी प्रवेश करतो.या नदीवरती पुल उभारल्यास लांजा ते राजापुर हे अंतर काही तासांचे होईल.हा प्रकल्प शासनाच्या विचारधीन असून लवकरच कामाला सुरुवात होईल अशी आशा आहे.
गोळवशी हे ७०० ते ८०0 लोकसंख्येचे गांव होय.सहा वाडयांची ईथे नागरी वस्ती आहे.गावातील लोक प्रामुख्याने शेती हा व्यवसाय करतात.कोरडवाहु व खडकाळ जमीनीमुळे पिके घेण्यावरती मर्यादा येतात.येथील शेतकरी शेतीसाठी सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर अवलंबुन आहे.त्यामुळे पावसाळी पिके यामध्ये भातशेतीचे प्रमुख उत्पादन याजोडीने फळभाज्या पालेभाज्या यांची लागवड केली जाते.पशुपालन हा कमी प्रमाणात जोडधंदा केला जातो.कोकणातील प्रसिद्ध हापुस आंबा व काजूगर याच्या गावामध्ये फळबागा आहेत.गावातील आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून याकडे पाहिले जाते.याबरोबरच फणस,चिकु,पेरू,नारळ,सुपारी याची फळझाडे सुद्धा घरोघर दिसून येतात.कोकणातील रानमेवा अशी ओळख असणारी करवंदे,जांभुळ,आवळा,चिंच,अशी अनेक फळे गावाच्या आजुबाजूला असणाऱ्या जंगलात विपुल प्रमाणात आढळतात.एप्रिल ते मे महीना भेटीसाठी योग्य कालावधी आहे.

●गावातील प्रेक्षणीय स्थळे ●

@ आई नागादेवी मंदिर © 
आई नागादेवी हि गावाची ग्रामदेवता होय.स्वयंभु शंकराचे हे स्थान अत्यंत रमणीय अशा ठिकाणी आहे.येथील वातावरण मन प्रफुल्लीत केल्याशिवाय राहत नाही.संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तगण मोठ्या संख्येने आईच्या दर्शनासाठी येत असतात.विशेष आकर्षण म्हणजे बायंगी देवता होय.देवळाच्या बाजूला असणारी देवराई,प्राचीन तळे,सतीची १0५ शिल्पे अभ्यासण्यासारखी आहेत.जैवविविधतेने नटलेला असा हा एकूण परिसर आहे.
© मुचकुंदी नदी खोरे ©
गावच्या सीमेवरुन वाहत जाणारी मुचकुंदी माईचे विस्तीर्ण पात्र पाहताना आत्माही सुखावतो.हिरवागार असा संपूर्ण परिसर,नारळी_पोफळीच्या बागा,लांबवर पसरलेले मैदान व धावगी देवाचे मंदिर यांना आवर्जून भेट दयायलाच हवी.पावसाळा संपल्यानंतरचा काळ यासाठी सर्वोत्तम आहे.

● गावातील प्रमुख सण ●
© होळी © 
हा गावचा प्रमुख सण आहे.या दिवशी सर्व गावकरी होळीचा मांड या पुरातन ठिकाणी जमतात.गावातील सर्व प्रमुख देवतांची पालखी सजवली जाते.यालाच रुपे लावणे असे म्हणतात.प्रामुख्याने आंबा किंवा ताड या झाडांच्या होळया असतात.ही होळी आदल्या दिवशी रात्री देवीची पालखी घेवून वाजतगाजत मांडावर आणली जाते.दुपारच्या सुमारास पोर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी होळया पेटवल्या जातात.एकुण दोन होळयापैकी होम होळीभवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा घालुन मानाचा नारळ आगीतुन उडी मारुन पाडला जातो.तसेच दिवसभर देवीला कोंबडीबकरे यांचे नवस केले जातात.यानंतर तीन दिवसानंतर खावडी गावची नवलादेवी आणि नागादेवी या बहिणीची मांडावर ओटी भरून भेट होते.व दोन्ही पालख्या नाचवल्या जातात.हा सोहळा पाहण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र येतात. शिवजयंती साजरी झाली कि गावकरी देवीची पालखी घेवून गांव प्रदक्षिणेला म्हणजेच गावातील प्रत्येक घरामध्ये पालखी घेवून जातात.दहा दिवस गावात आनंदाला उत्साहाला भरते येते.कित्येक भोजनावळी उठतात.
© गणेश उत्सव ©
या सणाला मुंबईतील चाकरमानी गावात हजेरी लावतात.संपूर्ण गावामध्ये घरगुती गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते.सामूहिक आरत्या व भजने,फुगडया,जाखडी असे कार्यक्रम करून रात्रभर जागरणे केली जातात.गौराई मातेचे मनोभावे पूजन केले जाते.अनुक्रमे ६ व १० दिवसाच्या बाप्पाना पारंपारिक वारकरी संप्रदायाच्या अभंगावरती दिंडी काढून आणि ढोलताशांच्या गजरात साश्रुनयनांनी निरोप दिला जातो.गणेशमुर्त्या शाडुच्या मातीच्या असल्यामुळे तसेच मुर्तीचे नैसर्गिक स्त्रोतांमध्ये विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा केला जातो.

● विशेष आकर्षण ● 
© खांबडवाडी नवरात्र उत्सव व गोकुळाष्ठमी ©
आश्विन शुद्ध पक्षी दुर्गादेवीचे मोठया जल्लोषात खांबडवाडी समाजमंदिर येथे आगमन होते.गेली 19 वर्ष खांबडवाडी मित्र मंडळ देवीची प्रतिष्ठापना करत आले आहे.यामध्ये 'नऊ दिवस नऊ कार्यक्रम' हि संकल्पना राबविली जाते.भजन,कीर्तन,जाखडी,रास गरबा,गोपी नृत्य,लहान मुलांसाठी स्पर्धा,गुणवंत विद्यार्थी व थोरामोठयांचा सत्कार यासारखे उपक्रम राबविले जातात.दसरयाच्या दिवशी सोनेलुट करून सर्व ग्रामस्थांची गळाभेट घेतली जाते.
व दुसऱ्या दिवशी देवीची विसर्जन मिरवणूक काढुन भजनाच्या तालावर आणि वाद्यांच्या गजरामध्ये धरणामध्ये विसर्जन केले जाते. मोठ्या प्रमाणावर भक्तगण या सोहळ्याला उपस्थीत असतात.यावेळी भाविकाना प्रसादाचे वाटप केले जाते.
गोकुळाष्टमी व दहीहंडी उत्सव खांबडवाडीमध्ये गेल्या ५० वर्षापासून हा सोहळा साजरा केला जातो.गोकुळाष्टमीला वाडीतील सर्व ग्रामस्थ एकत्र येवून श्रीकृष्णाची मनोभावे पूजा व आरती करतात.बाळ श्रीकृष्णाला पाळण्यात घालून स्त्रीया पाळणा गीते गातात.दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असतो.देवाला आलेल्या नवसाच्या हंडया चार ते पाच थरांवर बांधल्या जातात.भजनाच्या दिंडीमधून श्रीकृष्णावरील कवने गायली जातात.पाण्याचा कमी वापर आणि योग्य नियोजनाने व गांवकऱ्यांच्या सहभागातुन ४ ते ५ हंडया बाळगोपाळ फोडतात.भाविकाना प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता होते.

© गावातील शाळा ©
पहिली ते सातवीपर्यन्त म्हणजेच प्राथमिक शिक्षणाची गावात सोय आहे.गावामध्ये एकुण तीन शाळा आहेत.माध्यमिक शिक्षणासाठी बाजुच्याच खावडी गावातील माध्यमिक शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी लांजा येथे जावे लागते.

● गावात कसे पोचाल ●
ट्रेन -जवळचे स्टेशन रत्नागिरी,आडवली,विलवडे,लांजा

बस-रत्नागिरी ते लांजा आगार
लांजा आगार ते गोळवशी गांव
रिक्षा /वडाप/जीप


लेखक
किरण प्रकाश भालेकर
Bhalekar117@Gmail.com
Bhalekar117.blogspot.com
Facebook.com/Bhalekar117







सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६

कोंढाने लेणी व किल्ले राजमाची भटकंती

कोंढाने लेणी व किल्ले राजमाची भटकंती रविवार दि.७ ऑगस्ट २०१६ रोजी पार पडली. यावेळी भटकंतीचे साथीदार होते लांजा कॉलेज ग्रुपचे आमचे जिगरी दोस्त आशीष रांबाडे,प्रमोद दरडे,अनिल दरडे. बारा मित्रांमधून अवघे चारजण शेवटच्या वेळी ट्रेकसाठी आले होते.तरीही न डगमगता ट्रेकला जायचे याचा निर्धार होताच.सकाळी ६ वाजता सर्वजन दादरला भेटलो.तब्बल वर्षभराने ही भेट होती.ट्रेकसाठी अतिशय नियोजित असा प्लान होता.त्यानुसार सकाळी ६.२४ची कर्जत फास्ट लोकल दादरवरून पकडली.गर्दी तुरळक असल्यामुळे बसायला जागा मिळाली.बरोबर ८.00 वाजता कर्जत स्टेशनला पोचलो.तिकडे नाश्ता उरकुन घेतला आणि बरोबर खाण्याचे सामान (बिस्कीट,केळी,वेफर्स)घेतले.१५ मिनिटे चालत श्रीराम पुलापर्यंत पोचलो तोपर्यंत ८.३० वाजले होते.आम्हाला कोंढाणे गाव गाठायचे होते.थोडीशी घासाघीस करुन वडापवाला आम्हाला राजमाचीच्या वाटेवर मंदिरापर्यन्त सोडण्यास तयार झाला.रस्त्याला मधोमध खड्डे पडल्यामुळे शरीराचा चांगलाच मसाज घडून झाला.राजमाचीच्या चढाईला बरोबर ९.३०ला आम्ही सुरुवात केली.१० मिनिटावरच एक स्वच्छ वाहणारा ओहळ आणि त्यावरून कोसळणारा धबधब्याचे विहंगम दृश्य दिसते.ईथे जो भिजला नाही तो खरा ट्रेकर्स कसला ?जलधारानी सचैल स्नान केले.आणि फोटोग्राफीची हौस भागवुन घेतली.खऱ्या अर्थाने आता ट्रेकचा श्रीगणेशा झाला होता.
कर्जत स्टेशन पासून १५ किमीवर असणाऱ्या कोंढाने गावात घनदाट जंगलात लपली आहेत कोंढाने लेणीसमूह.निसर्गाचा आस्वाद घेत किर्र झाडीतुन 4 किमी चालल्यावर हा लेणीसमूह आपल्या दृष्टीस पडतो. लेणी दर्शन संध्याकाळी करायचे असल्याने राजमाची जवळ करू लागलो.लेण्यांच्या खालुनच ही वाट जाते.

राजमाची सारखा विशाल आणि निसर्गसौंदर्याने नटलेला गिरीदुर्ग.पावसाळ्यात याचे वैभव ज्याने पाहिले त्याच्याइतका नशीबवान कोणीच नाही.घनदाट जंगलातून जाणारी पायवाट सोबतीला खेकड्यांची सरसर,दुथडी भरून वाहणारे पांढरेशुभ्र् ओहळ,असंख्य कातळकडे,उंचावरुन कोसळणारे धबधबे,आकाशाशी स्पर्धा करणारे सुळके ,दाट धुके, शारीरिक क्षमता जोखणारी चढाई असा राजमाचीचा मार्ग सजला आहे.कोंढाणे लेण्यांपासून पुढे जवळच्या अंतरावर आणि राजमाचीच्या वाटेवर परत एक ओहोळ लागतो.त्याच्या डाव्या बाजूला काळजीपूर्वक जंगलात पाहिले तर एक प्रचंड मोठ्या आकाराचा जलप्रपात कड्यावरुन कोसळत होता.या परिसरातील हा मोठा धबधबा आहे.तिथपर्यंत पोचता येईल का यासाठी वाट शोधावी लागणार होती.दगडातुन आणि मोठ्या पाण्यातून ही वाट होती.अत्यंत काळजीपूर्वक या धबधब्याखाली जावून पाहणी केली.वेळ फार कमी असल्याने संध्याकाळी या ठिकाणी यायचे असे मनाशी ठरवुन अधिक वेगाने राजमाचीकडे वळलो.किर्र जंगलातून जाणारी पायवाट सोबतीला थंडगार वारा आणि धबधब्यांखाली चिंब भिजत चढाई न थांबता चालूच होती.७० वर्षाचे आजोबा काठी घेवून जंगलातून एकटेच खाली बाजाराला निघाले होते.ते पाहून थकवा कुठच्या कुठे पळून गेला.पठारावर येताच गडाची बेलाग तटबंदी दृष्टीक्षेपात येत होती.जवळच उधेवाडी गांव वसलेले आहे.३००० फुट ऊंचीवरचे हे गांव अतिशय दुर्गम असे आहे.येथील ग्रामस्थाना घरगुती सामान आणायचे झाले तरी २ तास पूर्ण डोंगर उतरुन कोंढाणेला जावुन बाजारहाट करुन परत चढावे लागते.उधेवाडीमध्ये घरगुती जेवण सांगून आम्ही पुढे निघालो.इथून कालभैरव मंदिरापर्यन्त पक्की वाट बांधलेली आहे.मंदिरापर्यन्त दुपारचे १२.०० वाजले होते.कालभैरव हे या गावचे ग्रामदैवत होय.शाहू महाराज आणि पाहिले बाजीराव यांनी या मंदिराला भेट दिलेली आहे.मंदीराच्या बाजुला तोफा ठेवलेल्या आहेत.समोरच तूटलेली दिप माळ,खंडोबाचा घोडा,उजव्या बाजूला पाण्याचे टाके आहे.मंदिराच्या समोरची वाट आपल्याला श्रीवर्धनकडे घेवून जाते.आणि पाठीमागची वाट मनरंजनकड़े घेवून जाते.तसे म्हटले तर हे दोन्ही छोटे किल्लेच आहेत.गेल्यावर्षी दसऱ्याच्या दिवशी कालभैरव मंदिरापर्यन्त वेळेअभावी चढाई अर्धवट सोडावी लागली होती.देवाला दसऱ्याच्या दिवशी पुन्हा दर्शनाला येईन हे दिलेले वचन मी पाळले होते. श्रीवर्धन आणि मनरंजन बुरुज तसेच काळभैरव मंदीर गडाच्या वैभवात अजुन भर टाकतात. 

श्रीवर्धनची वाट पकडून चालू लागलो.वाट थोडी धोकादायक उभ्या चढनीची आणि कडेकपारीची आहे.अर्ध्या तासात दरवाजाजवळ पोचलो.सर्वजण गडाच्या पाया पडलो.छत्रपतींची गारद आसमंतात दुमदुमुन गेली.सर्वानी त्याला साथ दिली.थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला पाण्याचे टाके लागते.पाणी खराब आहे.जवळच एक तोफ आहे.ते पाहून सरळ पुढे गेल्यावर धान्याचे कोठार लागते.हजारो टन धान्य राहु शकेल इतके प्रचंड कोठार नैसर्गिक कपारीमध्ये बांधलेले आहे.ईथे ग्रामस्थानी चहाची सोय केली होती.चहा पिऊन थोड़ी विश्रांती केली आणि पुन्हा चालू लागलो.थोडेसे पुढे गेल्यावर डाव्या हाताला पाण्याचे टाके पाहून निशानाची जागा बुरुज बघितला.येथे एक पड़ीक वास्तुचे अवशेष दिसतात.भगव्याला प्रणाम केला आणि खालच्या बुरुजाकडे वळलो.गडावर गवत खुप वाढले आहे त्यामुळे थोडी काळजी घ्यावी. खाली उतरताना परत एक नितळ पाण्याचे टाकं आहे.श्रीवर्धनचा खालच्या बुरुजावर भगवा फडकत होता.समोर दरीमध्ये कित्येक फूटावरुन कोसळणारा विशालकाय असा धबधबा आपली नजर खिळवुन ठेवतो.तासनतास पाहत रहावे असे ते दृश्य आहे.इकडे थोडे फ़ोटो काढले.आणि पुढे निघालो जवळच एक चोरदिंडीवजा भुयार आहे.त्यातून खाली उतरलो आणि परत दुसऱ्या वाटेने बुरुजावर आलो.जंग्या,तोफांची जागा,तटबंदी पाहून परतीचा प्रवास धरणार तोच पावसाने बघता बघता रौद्ररूप धारण केले.प्रचंड हवा आणि मुसळधार पाऊस कोणाचा पाय जाग्यावर राहिना.तरीही त्या स्थीतीत अंगावर पाऊस झेलत आम्ही आल्या वाटेने गड उतरुन उधेवाडीत जेवणाच्या ठिकाणी पोचलो.

गावच्यासारखे घर,प्रशस्त अंगण,सारवलेली जमीन,दिलखुलास बोलणारी माणसे असे एकंदर वातावरण होते.जमिनीवर जेवायला बसण्यासारखे दूसरे सुख ते कोणते बरे ...!
गरम गरम भाकऱ्या,दोन भाज्या,वरणभात,लोणचेपापड,चटणीकांदा असा यथासांग मराठमोळा थाट होता.अप्पांच्या माचीवरचा बुधा कादंबरीचे नायक त्यांची हि मुले होत.
त्यांनी आमची आस्थेने विचारपुस केली.जेवणावर यथेच्छ ताव मारुन झाल्यावरही अंगातली हुडहुडी जाईना त्यामुळे थोडा आराम केला.एव्हाना ३.०० वाजले होते.घराच्या उजव्या बाजूने बाहेर पडणारी दगडी पायवाट आपल्याला एका प्राचीन हेमांडपती मंदीराकडे आणि तलावाकडे घेवून जाते.संपूर्ण दगडात बांधलेले गोधनेश्वर महादेवाचे मंदिर आहे.शिवपिंडी,समोर छोटे तळे त्यात गोमुखातुन बारमाही पाणी वाहत असते.आसनस्थ नंदी,दगडी दिपमाळ,गणपती आणि इतर देवतांच्या मुर्त्या प्राचीनतेची साक्ष देतात.मंदिर व खांब यावरील कलाकुसर थक्क करते.महादेवाची पूजा करुन थोडा वेळ मंदिरात घालवला.बाजुलाच असणारा प्राचीन उदयसागर तलाव पाहून आम्ही आल्या वाटेने परत फिरलो.3.30 वाजता आम्ही उधेवाडी सोडली.सकाळी पाहीलेला मोठा धबधबा नजरेसमोरुन हलत न्हवता.त्यामुळे वेगामध्येच मार्गक्रमणा चालू होती.धबधबा गाठेपर्यन्त संध्याकाळचे ५.०० वाजले होते.काळजीपूर्वक वाट काढत त्या जागी पोचलो.उंच कड्यावरुन पडणाऱ्या त्या जलधारांचा जंगलात एक वेगळाच नाद भरून राहिला होता.हे निसर्गसौंदर्य बराच वेळ डोळ्यात साठवुन घेण्याचा प्रयत्न करत होतो.उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा वेग इतका होता की बाहेर राहून सुद्धा भिजायला होत होते.पोट भरेपर्यंत फोटोग्राफी झाल्यावर आम्ही कोंढाने लेण्यांसाठी निघालो.
कोंढाने लेणी हा मानवी हातांचा अविष्कार आहे.दुसऱ्या वेळी येऊनही लेण्यांवरुन नजर हटत न्हवती. कान्हेरी,घारापूरी,महाकाली,मंडपेश्वर याबरोबर कोंढाणे हे प्राचीन मुंबई बेटाच्या अध्ययनाचे केंद्र होते.महायान व हीनयान पंथाचे बौद्व भिखु येथे अध्ययनासाठी वास्तव्याला असत.दर्शनी भागात मोठ्या आकाराचे स्तूप आहे आणि डाव्या बाजूला राहण्यासाठी खोल्या आहेत.लेण्यांच्या इथे बारमाही पाण्याचे टाके आहे.एका अखंड कातळात कोरलेली ही लेणी आहेत.लेण्यांच्या वरुन कोसळणाऱ्या धबधब्यांखाली मनसोक्त भिजलो.कपडे बदलून लेण्यांचा रामराम घेतला आणि सुसाट वेगाने मुंबईसाठी निघालो.कोंढाणे गावातुन कर्जत स्टेशनसाठी वडाप केली.बरोबर संध्याकाळी ७.०० वाजता कर्जत स्टेशनला पोचलो.गाडीला तब्बल अर्धा तास वेळ होता.तोपर्यंत फोटोंच्या देवाणघेवाणीचा कार्यक्रम उरकला.७.४५ कर्जत ते छत्रपती शिवाजी टर्मिनस गाडी पकडली.दादरला रात्री ९.३०ला ट्रेकची समाप्ती केली.आणि सर्वजण आपआपल्या घरी पांगले.बरोबर होते ओले कपडे आणि अविस्मरणीय आठवणींचे गाठोडे .....

लेखक 
किरण प्रकाश भालेकर
bhalekar117.blogspot.com
bhalekar117.wordpress.com
Facebook.com/bhalekar117/








शुक्रवार, ४ मार्च, २०१६

सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र


सह्याद्री प्रतिष्ठान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने आणि सहवासाने पुनीत झालेल्या महाराष्ट्रातील गडकोट म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीची आभूषणे व महाराष्ट्राच्या अस्मितेची प्रतीके म्हणावी लागतील कधी काळी वैभवाच्या आणि कीर्तीच्या शिखरावर विराजमान असलेली हि दुर्ग संपदा आज अडगळीला दुर्लक्षित अवस्थेत पडलेली उन-पावसाशी सामना करत शेवटचा घटका मोजीत आहे आणि हे असेच चालू राहिले तर हे ऐतिहासिक वैभव उद्या आपण गमावलेले असेल व त्यासाठी आजच्या पिढीला इतिहास व उद्याची पिढी केव्हाच माफ करणार नहि. स्वतः शिवरायांनी किल्ल्यांचे महत्त्व खालील शब्दात वर्णन केले आहे. “जैसे कुळबी शेतास माळा घालून शेत राखितो, तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत. तारवांस खीळे मारून बळकट करितात तशी राज्यास बळकटी किल्यांची आहे. किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्याची उमर गुजरून जाईल. आपणास धर्मस्थापना व राज्यसंपादन करणे होय. सर्वांस अन्न लावून, शत्रुप्रवेश न होय ते किल्ल्यांमुळे होते. सर्वांचा निर्वाह आणि दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे-जुने तीनशेसाठ किल्ले हजरतीस आहेत. एक-एक किल्ला वर्ष-वर्ष लढला, तरी तीनशेसाठ वर्षे पाहिजेत.” आणि पुढच्या पन्नास वर्षात सह्याद्रीने तेच अनुभवले. ‘थोरले महाराज यांनी हे राज्य गडावरुन निर्माण केले’ आणि ‘गड होते म्हणुन राज्य मात्र अवरिष्ट राहिले’ या आज्ञापत्रातील २ वाक्यांवरुन शिवकाळातील गडांची महती स्पष्ट होते. रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात ८ व्या प्रकरणात किल्ल्यांचे महत्त्व, त्यांची रचना व व्यवस्था यावर उहापोह केला आहे. त्यात म्हटले आहे की “गड़कोट हेच राज्य, गड़कोट म्हणजे राज्याचे मुळ, गड़कोट म्हणजे खजिना, गड़कोट म्हणजे सैन्याचे बळ, गड़कोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गड़कोट म्हणजे आपली वसतिस्थळे, गड़कोट म्हणजे सुखनिद्रागार किंवा गड़कोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण.” अशा या राकट देशाचा प्रतिनिधी म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीत कोठेही उभे राहून नजर फिरवली तर, दर चार-दोन शिखरांआड एखादं शिखर तटबुरुजांचं शेला-पागोटे चढवून उभं राहिलेलं आढळतं. यातील बहुतेक दुर्गांनी श्रीशिवछत्रपतींची चरणधूळ आपल्या मस्तकी धारण केली आहे. त्या शिवस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची धारातीर्थे आहेत. या गड- कोटांची रक्षणाची जबाबदारी हि आजच्या पिढीची आहे. आपल्या अवषेशातून छत्रपती शिवराय व मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे गडकोट संरक्षण होणे काळाची गरज असून त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे. स्वराज्य आणि गडकोट यांना वेगळे करता येत नाही इंग्रजांच्या भारतातील शिर्कावानंतर त्यांनी सर्वात पहिल्यन्दा गडकोट उध्वस्त केले गडकोटांकडे जाणार्या वाटा पुसत सामार्थ्यशाली गडकोट अडगळीला टाकले. स्वातंत्र्य नंतरही या गडकोटांचे दुर्दैव संपलेले नाही शिवरायांच्या सामर्थ्याचे प्रतिक असलेले गडकोट आज आपल्या उरल्या सुरलेल्या अवशेशांसह उन पावसालाल तोंड देत शेवटचे श्वास घेत आहेत. महाराष्ट्रातले बहुतेक किल्ले पुरातत्व विभागाच्या आणि वन विभागाच्या ताब्यात आहेत खरतर या महाराष्ट्राच्या वैभवाची देखभाल , दुरुस्ती व संवर्धनाची जबाबदारी या विभागाची म्हणजेच शासनाची आहे पण शासनाच्या उदासीन व अस्पष्ट धोरनां मुळे या गडकोटांची उपेक्षा संपलेली नाही काही अपवाद वगळता हौसे नौसे पर्यटक आपल्या बेताल वागण्याने गडकोटांचे विद्रुपीकरण करतात लोकवस्ती जवलचे किल्ले तर आणखीनच दुर्दैवी कधी काळी शूरवीर मावळ्यांचा सहवास लाभलेले हे किल्ले दारूड्यांचे , जुगार्यांचे अड्डे बनले आहेत या सर्वांचा बंदोबस्त करण्याची शासनाकडे हिम्मत नाही कि इच्छा नाही ? तेच जाने ! महाराष्ट्रातील गडदुर्गांच्या संवर्धानासाठी शासना बरोबरच समाजाला जागे करण्यासाठी गेले तीन वर्षापासून ” शिवदुर्ग अस्मिता आंदोलन ” सातत्याने लोकशाही पूरक आंदोलनच्या सहायाने दुर्ग संवर्धानाची शासनाकडे आग्रही मागणी करत आहे. गड कोटांवर जाऊन संवर्धन करायचे म्हणजे नक्की काय करायचे हा हि एक प्रश्न आजच्या पिढी समोर आहे आज अनेक दुर्गसंवर्धन संस्था किल्ल्यावर दुर्गसंवर्धनाचे काम करत आहेत त्या मध्ये देखील तुम्ही सामील होऊ शकता सह्याद्री प्रतिष्ठानने आत्तापर्यंत १५८ दुर्ग संवर्धान मोहिमा अनेक गडकोटांवर घेतल्या आहेत त्यामध्ये चांगल्या प्रकारे सोयी सुविधा उपलब्ध करून गड कोटांचे संवर्धन केले आहे. सगळ्यांनी जर विचार केला तर त्यानाही अश्या प्रकारचे संवर्धन गड कोटांवर करता येईल शिवजयंतीला सक्रीय होणारे महाराष्ट्रात लाखो प्रतिष्ठान आणि संघटना आपल्याला सापडतील.. पण वर्षभर शिवकार्यासाठी झटणाऱ्या संघटना हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच आहेत त्यांच्यातीलच एक पण तरीही सर्वांपेक्षा नक्कीच वेगळे असे हे एकच ‘सह्याद्री प्रतिष्ठान’. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जन्माने नाहीतर कार्याने मोठे झाले.. अश्या विचारांना धरून चालणारी हि संघटना आहे. छत्रपती शिवराय त्यांच्या विचारातून आणि कार्यातून अजून हि जिवंत आहेत पण वाईट याचे वाटते कि इथल्या प्रत्येक माणसाची मने मेलेली आहेत.. शिवरायांचे प्रत्येक कार्य हे मरगळलेल्या मराठी माणसाला प्रेरणा देतं.. आणि त्याच विचारांवर त्यांची प्रेरणा घेऊन आज ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ वर्षभर शिवरायांच्या कार्य घरोघरी पोहचविण्याचा प्रयत्न करतेय ! सह्याद्री प्रतिष्ठानकडून वर्षभर राबविले जाणारे उपक्रम १) सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांवर आतापर्यंत २५० पेक्षा जास्त दुर्गसंवर्धन मोहिमा राबविल्या आहेत या मोहिमे मधे पुढील उपक्रम राबविले गेले आहेत – Ø किल्यावर जाणार्या वाटा दुरुस्त करने , Ø किल्ल्यावर असणार्या प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या दारूच्या बाटल्या गोळा करणे ज्या मुळे किल्ल्यच्या प्रदुर्षानाला आळा बसवने. Ø किल्ल्याच्या भिंतीवर, तटावर , बुरुजांवर वाढलेली झाडे झुडपे काढून टाकणे त्याच्या मुळांवर एसिड ओतून ती समूळ नष्ट करने. Ø किल्ल्यावर असणार्या पाण्याच्या टाक्या साफ करणे , जेणे करून किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल. Ø किल्ल्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या तोफा , तोफगोळे जुन्या वस्तूंचे अवशेष व्यवस्थित ठेवणे. Ø किल्य्यावर जाताना किल्ल्याचे दिशादर्शक माहितीदर्शक फलक लावणे जेणेकरून लोकांना किल्ल्य्बाबत माहिती मिळेल. Ø तटावरून, बुरुजावरून, निखळलेले दगड परत होत्या त्या ठिकाणी व्यवस्थित बसवने. 2) छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार घराघरात व्हावा यासाठी दरवर्षी ३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारीला किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड असा ५ दिवसांच्या भव्य पालखी सोहळयाचे आयोजन करून त्यावर आधारित शिवरथ या माहिती पटाची निर्मिती केली जाते. महाराष्ट्रभर या सोहळ्याचा प्रसार होण्यासाठी व्हिडिओ सीडीचे मोफत वितरण केले जाते. या वर्षी शिवरथ यात्रेस पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. ३) छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार घराघरात व्हावा यासाठी दरवर्षी १४ में या त्यांच्या जयंतीच्या दिवशी स्वाभिमान यात्रा पिंपरी-चिंचवड ते किल्ले पुरंदर अशी काढली जाते. ४)प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सततचा पाठ पुरावा म्हणून पत्र, निवेदने यामार्फत सरकारकडे केला जातो. ५) महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या बाबतीत उदासीन पुरातत्व खाते तसेच झोपेचे सोंग घेणारे महाराष्ट्र सरकार यांना जागे करण्यासाठी शिवदुर्ग अस्मिता आंदोलनाच्या माध्यमातून निदर्शने, उपोषणे, जेल भरो, रास्ता रोको अशा प्रकारच्या आंदोलनातून जनजागृती करण्याचे प्रयत्न केले जातात. ६)महाराष्ट्रातील ४०० किल्ल्यांचे संवर्धन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून सह्याद्री प्रतिष्ठान कायदेशीर लढा देत आहे. ७) सह्याद्री पुरस्कार, शिवदुर्ग अस्मिता पुरस्कार, शिवरथ पुरस्कार, असे पुरस्कार दरवर्षी शिवकार्य, दुर्ग संवर्धन करणार्या संघटना, व्यक्ति, याना देऊन त्यांचा गौरव केला जातो. ८) महाराष्ट्रातील ४०० गड-किल्ल्यांच्या ४५,००० फोटोंचे लिम्का बुक ऑफ रेकोर्डस मध्ये नोंद असलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन सर्वाना मोफत दाखवले जाते. ९)शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींसाठी छत्रपती शिवरायांची महती पटवून देण्यासाठी प्रसिद्ध इतिहासकारांची व्याख्याने आणि मार्गदर्शन, महाराष्ट्रभर पोवाडे व मर्दानी खेळांचे आयोजन असे विविध प्रकल्प प्रतिष्ठान राबवीत आहे. १०)गड किल्ल्यांची माहिती असलेली www.SahyadriPratishthan.com हि वेबसाईट तसेच विविध पुस्तके प्रतिष्ठान कडून प्रकाशित करून ती दुर्गप्रेमींना विनामूल्य वितरीत केली जातात. ११)सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन प्रतिष्ठानकडून आरोग्य, नेत्रदान शिबिर, रक्तदान शिबिर , शैक्षणिक व पर्यावरण विषयक उपक्रम राबविले जातात. १२) सामाजिक जाणीवेतून वर्षातून ४ वेळा रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते तसेच सर्व सभासदांची रक्तगटाची यादी तयार करून तातडीच्या प्रसंगी रक्ताचा पुरवठा केला जातो. १३) इतिहासाची माहिती लोकांना होण्यसाठी सर्व शाळांमधून मोफत स्लाइड शो च्या माध्यमातून गडकोटांची माहिती पुरवली जाते. १४) ऐतिहासिक शस्त्रे, वस्तू , प्रदर्शने भरउन लोकांना मोफत त्याची माहिती पुरवली जाते. १५) किल्ल्यावर जाणार्या सहलींना अथवा ग्रुपला किल्ल्याची माहिती देण्यसाठी मोफत मार्गदर्शक पुरवणे. १६) इतिहास अभ्यासक अश्या नव्या पिढीसाठी जुनी सहजा सहजी न मिळणारी अशी ५०० च्या वरती जुनी पुस्तके PDF स्वरुपात मोफत उपलब्ध करून देण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत केले जात आहे. या वर्षीची यशस्वी कार्याची उदाहरणे १) छत्रपति संभाजी महाराजांची जन्मनोंद शालेय पाठ्यपुस्तकात होण्यासाठी यशस्वी आंदोलन. पाठ्यपुस्तकात छत्रपति संभाजी महाराजांची जन्मनोंद करणार असल्याचे लेखी पत्र मिळाले. २) महाराष्ट्रातील ४०० किल्ल्यांचे संवर्धन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेच्या निकालात ४७ करोड़ रुपयांचा निधि मंजूर ३) सिंहगड़ किल्यावर कल्याण दरवाज्यासाठी यशस्वी आंदोलन, मुख्यमंत्री विशेष निधीतून १.७५ करोड़ रुपये निधि मंजूर करण्यात आला. ४) महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच गड़ किल्ल्यांवर पोवाड्याची निर्मिति व प्र नितिन बांनगडे पाटिल यांचे दुर्ग संवर्धन या विषयवार व्यख्यानाच्या सी डी ची निर्मिति. ५) राज्यस्तरावर सर्व संस्थाना एकत्रित आणून राज्यस्तरीय दुर्ग संवर्धन समिती स्थापन करण्याचे कार्य संस्थे मार्फत केले गेले आहे.

मंगळवार, १२ जानेवारी, २०१६

घारापुरी लेणी आणि किल्ला (Elephanta caves)


जाण्याचे मार्ग : गेट वे ऑफ इंडिया ते घारापुरी कालावधी _एक तास (बोटीतुन) घारापुरीची लेणी ऊर्फ एलिफंटा केव्ह्‌ज ही महाराष्ट्रामधील मुंबईनजीकच्या घारापुरी बेटांवरील लेणी आहेत. पाषाणात खोदलेली ही लेणी इ.स.चे ९ वे शतक ते १३ वे शतक या कालखंडात निर्मिण्यात आली. १९८७साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा देण्यात आला. घारापुरी बेटांवर पोहोचण्यासाठी मुंबई शहरातील गेट वे ऑफ इंडियापासून अरबी समुद्रात लाँचने जावे लागते. लाँचचा हा प्रवास साधारण तासाभराचा आहे. या एका तासाच्या सागरी प्रवासात समुद्रावर विहार करणाऱ्या नानाविध पक्षी-बगळ्यांबरोबरच मुंबईचे दुरुन दिसणारे विहंगम रूपही न्याहाळता येतं. शिवाय बॉम्बे हाय नावाचे समुद्रातून उत्खनन करून पेट्रोलियम मिळवणारे क्षेत्र, न्हावा शेवा बंदर, देशविदेशांतील मोठमोठ्या व्यापारी नौका यांचेही दर्शन होते. समुद्रात थोडेसे आत गेल्यानंतर सीगल पक्ष्यांचे अनेक थवे लाँचवर घिरट्या घालायला लागतात. या पक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे अन्नपदार्थ हवेतच झेलण्याची त्यांची क्षमता होय! लाँचेतील अनेक प्रवासी समुद्रात सीगल पक्ष्यांबरोबर हा खेळ खेळायला सुरुवात करतात. हवेत भिरकावलेल्या शेंगा, बिस्किटे हे सीगल पक्षी हवेतच आपल्या चोचीत लीलया झेलतात.आणि फस्त करतात. लाँचेतील लहान मुलांना हा खेळ भरपूर आनंद देऊन जातो. हरखून गेलेल्या अशा वातावरणातच तासाभराचा हा सागरी प्रवास नकळत संपतो आणि आपण घारापुरी बेटाच्या काठाला लागतो. आपलं स्वागत करण्यासाठी आणि अर्थातच एलिफंटा लेण्यांच्या पायथ्याशी नेण्यासाठी तिथे एक मिनी ट्रेन सज्ज असते. सागराच्या लाटा झेलत-झेलत मिनी ट्रेन पुढे सरकू लागते आणि आपल्या देशाचा वैभवशाली भूतकाळ आपल्यासमोर उलगडू लागतो. एलिफंटा लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन ९०० ते १३००च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे. एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली आहेत. ज्या काळी पाश्चात्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतकी अफाट कलाकृती कशी निर्मिली असेल, यावरच आपले मन चिंतन करू लागते. लेणी पाहून मन जितकं भरून येते तितकेच ते अभिमानाने पुलकितही होतं. ही लेणी म्हणजे मूर्तिकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. मुख्य लेण्याच्या आत प्रवेश करताच समोर वीस फूट उंचीचे त्रिमूर्तीचे शिल्प दिसते. त्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील शांत भाव पाहून आपले मनही तशाच शांतीचा अनुभव घेऊ लागते. याशिवाय लेण्यांमधील नटराज, योगेश्वर आदी विविध शिल्पांना 'युनिक' म्हणता येईल इतपत वेगळेपण देण्यात आले आहे. त्यावरील भावही 'एकमेवाद्वितीय' असेच आहेत. लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते. त्यावरून या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे.