कोकण डायरी

कोकणाला लाभलेले अजून एक वरदान म्हणजे फणस होय.फणस माहित नसेल असा मराठी माणूस विरळाच या फणसाची चवच अशी मधुर आहे कि आठवण आली तरी जिभेवर पाणी सुटावे ...

कोकणातील प्रत्येक घराच्या जवळ वडिलोपार्जित भली थोरली फणसाची 5-6 प्रत्येकी झाडे असणारच.कापा व बरका हे याचे कोकणातील दोन मुख्य प्रकार पडतात.यापैकी कापा फणस कमी गोड व रसाळ असतो.तर बरका हा अधिक मधुर व रसाळ चिकट असतो.फणस काढायला चाललो आहे ?? असे म्हटल्यावर घरातील बाया सांगणार मला एक बरका मला तर मला कापा घेऊन ये. कारण प्रत्येकाचे वेगवेगळे उपयोग आहेत.त्यामुळे हे कापाप्रेमी व बरकेप्रेमी कोकणात घराघरात पाहायला मिळतात बरं..

या फणसाचे 10-15 गरे खाल्ले तर पोट भरलेच म्हणून समजा अर्थात आता आमचे भरत नाही आम्ही अक्खा खाऊ शकतो तो मुद्दा वेगळा..😊 जास्त खाल्ले कि घरचे ओरडणार बस बस जास्त खाऊ नकोस पोट दुखेल  एक फणस एक घरात कापला तर आजूबाजूची 4-5 घरे आणि त्यातली सगळी चिलीपिली नुसती वासाने फणसाभोवती झुंबड करणार मग पाच मिनिटात फणस संपलाच पाहिजे.
मे महिन्यात घरोघरी दिसणारे हे गोड दृश्य असते.
फणस तयार होऊ लागला कि त्या कोवळ्या फणसाची पूस भाजी सुद्धा तीळाचे कूट,शेंगदाणे,लसूण वापरून केली जाते अत्यंत रुचकर व पौष्टिक अशी हि भाजी असते.नंतर फणस मोठा झाल्यावर कच्चा फणस काढून त्याच्या गऱ्यांची भाजी केली जाते.फणस पोळ्या (साठ)आपल्याला माहीतच असतील यासाठी बरका फणस तर तळलेले गरे यासाठी कापा फणस लागतो.फणसाच्या बिया (आठळा) या सुद्धा भाजी करून व उकडवून खाल्ल्या जातात.याची चारखंडसुद्धा(टोकदार भाग) वाया जात नाहीत बैलांचे ते आवडते खाद्य आहे असा हा एकही भाग वाया न जाणारा फणस म्हणजे कोकणासाठी एक वरदान आहे.

फणसाचा वापर घरबांधणीतील फर्निचर साठी मोठ्या प्रमाणात केला जातो त्यामुळे कोकणात या झाडांची बेसुमार तोड केली जाते याला कुठेतरी आळा घालणे गरजेचे आहे नाहीतर येणाऱ्या नवीन पिढ्याना काय दाखवणार ??? यासाठी प्रत्येक कोकण वासियाने दरवर्षी फणसाची झाडे जास्तीत जास्त प्रमाणात लावून त्यांचे संगोपन केले पाहिजे...

छायाचित्र व लेखन ...
किरण भालेकर

#कोकणदर्शन
#कोकणडायरी
#सफरसह्याद्रीट्रेकर्स
#भटक्यांचेअनोखेजग



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा