गुरुवार, २ मार्च, २०१७

मुंबईतील कोकणी माणूस....

#मुंबईतील_कोकणी_माणूस
#चाकरमानी
मुंबईत मे महिन्याचा अंगाला झोंबणारा उकाडा चालु झाला कि इथे राहणाऱ्या कोकणकरांना आपल्या गावातील कौलारु घराची आठवण आल्याशिवाय राहत नाही. गावच्या ओढीने पावले आपोआप गावाच्या दिशेने म्हणजेच जन्मभूमीकडे वळु लागतात.नदी जशी सागराच्या मिलनाच्या ओढीने वेगात वाहते तशीच काहीशी अवस्था मुंबईत राहणाऱ्या कोकणकरांची झालेली असते.कधी एकदा आपले गावचे घर गाठून पथारी पसरतोय  असे होते.कोकणातील कौलारु घरात मिळणारी वार्याची थंड झुळुक प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते.गावची स्वछ ताजी हवा मन अगदी प्रसन्न करणारी असते.मुंबईत काम करणारे हे कोकणकर कौतुकाने गावाकडे (चाकरमानी) या नावाने ओळखले जाते.असे हे चाकरमानी आपला दहा दिवसांचा संसार बोचक्यात गुंडाळून कोकणच्या प्रवासाला निघतात.
     कोकणात जाण्यासाठी सर्वाधीक पसंतीचा मार्ग म्हणजे कोकणकरांची अभिमान असणारी कोकण रेल्वे होय. कोकण रेल्वेचा हा खडतर मार्ग जगप्रसीद्ध आहे.याच मार्गावर रत्नागिरी जवळील दुर्गम अशा करबुडे येथे ६  किलोमीटर लांबीचा आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा आहे तर आशियातील सर्वात उंच पुल (रेल्वे) पानवल येथे आहे.याची ऊंची ६५ मीटर इतकी आहे. डोंगरातून रेल्वे धावेल ही अशक्य कल्पना भारतीयांनी शक्य करून दाखविली आहे. २ महीने अगोदरच रेल्वेची आरक्षीत तिकीटे काढली जातात. हे १० दिवस कोकण रेल्वे गर्दीने फुलुन गेलेली असते.प्लेटफॉर्मवर नजर जाईल तिकडे फक्त चाकरमानी दिसतील.कोकणात जाण्याचा दूसरा मार्ग म्हणजे रस्ते वाहतूक.यामध्ये सर्वाधिक पसंती S.T ला असते.सुरक्षीत प्रवासासाठी राज्य महामंडळाची S.T ओळखली जाते.तर काहीजण आपल्या स्वताच्या वाहनाने गावी जाणे पसंत करतात.
     कोकणावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे.इथला शेतकरी पूर्णतः निसर्गचक्रावर अवलंबून असतो. कोकणचा हापुस आंबा हा जगप्रसिद्व आहे.तसेच कोकणात आंब्याच्या पायरी ,तोतापुरी,रायवळ,भोपळी अशा  कितीतरी जाती आढळतात.रायवळ आंबे कोकणात विपुल प्रमाणात आहेत.याबरोबरीने फणस,काजू,जांभूळ,करवंदे,चीकू,रातांबे असा हा कोकणचा मेवा मे महिन्यामध्ये तयार होऊन चाकरमान्यांच्या भेटीची आतुरतेने वाट पहात असतो.
     वर्षभर बंद असणारी गावातील सर्व घरे यनिमित्ताने का होईना गजबजुन जातात.घराला या दहा दिवसांत घरपण येते.लहानग्यांची छोटी छोटी पावले इथल्या मातीशी एकरूप होऊन जातात.कोकणी माणूस होळी गणपती उस्तव या प्रमुख सणांबरोबर मे महिन्यातही गावात आपली उपस्थिती दर्शवितो.गावातील गावकरी व मुंबईकर यांमध्ये एकोपा वाढीस लागून बंधूभावाची भावना निर्माण होण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजीत केले जातात.यामध्ये सर्वांच्या सुखासाठी गावच्या/वाडीच्या महापूजेचे आयोजन केले जाते.महाप्रसाद तयार करण्यात येतो.सर्वजण एकत्र येवून गावच्या विकासासाठी देवाला साकडे घालतात. रात्री आरती भजन कीर्तन नमन नाटक जाखडी अशा  कोकणच्या पारंपारिक लोककला सादर केल्या जातात. गावाकडे परतल्यावर चाकरमानी गावातीलच एक होऊन जातो. गावातील जुने सवंगडी,शेजारी ,पाहुणे यांच्या भेटी घेण्यात तो रममाण होतो.गावाशी असलेलेली त्याची नाळ यनिमित्ताने अधिक घट्ट होते.
    मे महीना हा लग्नसरायांचा हक्काचा असा काळ होय.कोकणी माणूस वर्षभर अगोदर लग्न ठरवुन गावी लग्नसमारंभ करणे पसंत करतो.गावामध्ये लग्ने,हळदी ,पूजा यांचीच धामधुम असते.गावातील सर्वांचे मानपान करण्यात यजमान मंडळी अगदी थकुन जातात.
       कोकणी माणसाची देवावर अमाप श्रद्धा आहे. याला तुम्ही देवभोळेपणा असे म्हटलात तरी चालेल.पण कोकणी माणूस आपल्या गावच्या ग्रामदेवतेच्या उस्तवाला आवर्जून हजेरी लावणारच. मुंबईसारख्या आधुनिक सुखसोयीनी यूक्त असणाऱ्या शहरात राहुनही कोकणी माणूस आपल्या संस्कृतीला विसरलेला नाही. आपल्या गावाला विसरलेला नाही.म्हणूनच मला खुप अभिमान वाटतो कि मी सुद्धा एक सच्चा कोकणी माणूस आहे.
        
                                  लेखक
                             किरण भालेकर  
                       लांजा,गोळवशी,खांबडवाडी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा