रविवार, ५ मार्च, २०१७

राजकारण कि निव्वळ अर्थकारण......????

#रोखठोक

राजकारण म्हणजे फक्त पैसाकारण ...
" पैसे वाटा सीट जिंका " हे नव्या राजकारणाचे नवे ब्रीदवाक्य झाले आहे.राजकारण हा फक्त धनदांडग्या लोकांचा अड्डा आहे हे पुन्हा एकदा निर्विवाद सिद्ध झाले.सर्वसामान्य लोकांचा मात्र या घाणेरडया खेळात जीव जातो.
ज्यांना जनता कालपर्यंत ओळखतसुद्धा   न्हवती ते आज नगरसेवक झाले. पक्षनिष्ठा,निष्ठावंत,कडवट,कटटर असे शब्द ऐकले कि आता भीती वाटायला लागते.कारण त्या शब्दांचे महत्त्व आता फुटक्या कवडी इतकेही नाही.परिवर्तन होणार म्हणजे नक्की काय होणार?
त्याचा अर्थ आता नव्याने समजू लागला आहे.जे विभागातील नागरिकांना ओळखतही नाहीत ते आता विकासाची गंगा घरोघरी आणणार.

     ज्यांनी प्रामाणिकपणे जनतेची कामे केली त्यांना जनतेनेच दूर लोटले.कशासाठी तर हजार_दोन हजार रूपडयांसाठी...!!
" मतदारराजा जागा हो लोकशाहिचा तू धागा हो " मतदारराजा दोन हजार रुपये घेवुन एका दिवसापुरता जागा झाला.आता पुढील पाच वर्ष तो मांजराप्रमाणे डोळे मिटून सारे कर भरणार,महागाई ओढुनताणुन सहन करणार पण तोंडातुन चकार शब्द काढणार नाही.

निवडणुकीच्या काळातले कौरव_पांडव सुद्धा आता गळ्यात गळे घालून हे राज्य तूम्ही चालवा; ते राज्य मी चालवतो असे अतिशय समजुतीने संसाराच्या वाटण्या करतील.
महाभारतात यूधीष्ठर पांडवांसाठी फक्त पाच गावे मागत होता परंतु दुर्योधन सुईच्या अग्रभागाइतकी जमीन पांडवांना दयायला तयार झाला नाही त्यामुळे महाभारत घडले.पण आताचे राज्यकर्ते इतिहासातून समजुतदारपणा घ्यायला शिकले.त्यांना मुळात महाभारत करायचेच नाही आहे.सत्ता गेली तर हाती धुपाटणे घेण्याशिवाय गत्यंतर नाही.निवडणुकीपुरते दहा दिवस गल्लीबोळ पिंजून काढतात ते परवडले नाहीतर रोजच फिरावे लागेल...
हि सर्व नेतेमंडळी इतकी शहाणी असतील तर त्यातील एक टक्का शहाणपण आपल्या मतदारांकडे का नाही...
                    
                             किरण भालेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा