गुरुवार, २४ ऑगस्ट, २०१७

हरवत चाललेले कोकण..


काल वाचनात आलेला हा अप्रतिम लेख, लेखकाचं नाव नाही मिळालं पण मांडलेली समस्या आणि कथा जबरदस्त. एकदा जरूर वाचा. *आवा, ई कोकणवा हमार है बा!* हुस्स्-फुस्स् करत गाडी स्थानकात थांबली आणि उतरणार्‍यांची एकच झुंबड उडाली. जगन देखील आपली पिशवी सांभाळत कसाबसा उतरला. बघता बघता फलाटावर एकच गर्दी झाली. जगनने खांद्यावरची पिशवी खाली ठेवून मस्तपैकी आळस दिला. जनरल डब्यात गर्दीत बसावे लागल्याने अंग चांगलेच आंबले होते. आळस झटकत जगनने पिशवी परत खांद्यावर लावली आणि स्थानकाच्या बाहेर पडला. समोरच सगळ्या राजकीय पक्षांचे नेते हात जोडून गणेशभक्तांचे हार्दिक स्वागत करत फलकांवर झळकत होते. सगळ्या फलकांवर "कोकणचा विकास, हाच आमचा ध्यास" अशी वाक्ये झळकत होती. "मायझयांनी आपलो स्वत:चो ईकास केल्यांनी, बंगले, गाडिये उठवल्यांनी आणि आमची माणसा थयसरच." या विचारासरशी तोंडात जमलेला कडवटपणा जगनने थुंकून टाकला आणि तो रिक्षा बघू लागला. "रिक्षा मिळाली . विचारले , किती?" "सहाशे !" "काय सांगतस? रेल्वने ईलय दिडशे रुपयात मा रे." "सिजन आसा मा हो. हेच दिवस कमवचे, नंतर आम्ही बसानच." "पाचशे घे आणि चल." जगन रिक्षात बसला आणि फर्रर्र करत रिक्षा निघाली. चार वर्षांनी जगन गावी येत होता. म्हातारी जाऊन पाच वर्षे झाली. आणि चुलत भावंडात गणपतीची वर्सल असल्याने जगनची पाळी चार वर्षांनी होती. म्हातारी होती तेव्हा मध्येच चक्कर व्हायची पण आता तेही निमित्त राहिलं नव्हतं. रिक्षातून आजूबाजूला जगन बघत होता. सगळीकडे उंच इमारती दिसत होत्या. मध्येच टुमदार बंगले देखील उभे राहिले होते. नवीन बांधकामं सुरू होती. जगन बघतच राहिला. हा भाग खरतरं शहराबाहेरचा, पण आता भलताच सुधारलेला दिसत होता. "भलतीच सुधारणा दिसता हयसर," जगन रिक्षावाल्याला म्हणाला. "व्हय तर. सगळी मुंबयकरा फ्लॅट घेतत हयसर, म्हणजे गावाक येवचा झाला तर रवाक बरा. भायली माणसा पण घेतहत." "काय रेट चललोहा जागेचो?" "दोन वर्सापूर्वी दोन हजार होतो,आता चार हजार " 'म्हणजे बदलापूराक आसा तेवढो,' मनातच जगनने तुलना केली. "च्यायला, इतका कोकणचा भाव वाढला?" "रिक्षाचो धंदो बरो चलात तर" "कसला काय, आधी पन्नास रिक्षा होते, आता दोनशेच्या वर आसत. कसा तरी भागवतो झाला." म्हणेपर्यंत, रिक्षा कुडाळ थांब्यावर आली. पैसे चुकते करून जगन उतरला. गर्दीने थांबा फुलून गेला होता. एकच कोलाहल सुरू होता. थांब्यावरच्या उपाहारगृहात जगन घुसला, तोंड धुवून चहाची ऑर्डर दिली. तो फुळकवणी चहा घेताना त्याच्या पोटात ढवळलं, पण तरतरी आली. पिशवी खांद्याला लावून जगन बाजारात शिरला. बाजार माणसांनी भरून वाहत होता. दोन्ही बाजूंना बाया-बापड्या, बाप्ये भाजी घेऊन बसले होते. दुकानांनी गिर्‍हाईकं भरली होती. जगनला बरं वाटलं. आर्थिक मंदी, स्वाईन फ्लु कसलाही लवलेश त्या गर्दीवर नव्हता. गणपती म्हणजे कोकणाचा उत्सव. कोकणी माणूस दिवाळी साजरी करत नाही इतक्या उत्साहात गणपती साजरा करतो. आणि तो उत्साह बाजारात ओसंडून वाहत होता. जगनने आधी माटवीचं सामान घेतलं. कवंडाळं, हरणं, कांगलं, सुपारीची शिपटी, झालच तर मोठी काकडी, सगळं काही. सांगतील तो भाव. "दोन दिवस कमवतलो मा? आमचोय गणपती" हा संवाद प्रत्येक जण फेकत होता. इतक्यात एक केळीवाल्याची गाडी आली. "केळी घ्या, पन्नास रुपये डझन" "पन्नास ? मुंबयक गावतत ईसाक" जगन बोलला. "भई, ईधर यही भाव!" .... आयला कोकणात हिंदी? "किधरका रे तुम?" जगनने आपलं बंबईया हिंदी पाजळलं. "बंबईसे आया हू, यहा चार दिन ब्यापार के वास्ते आया," चेहर्‍यावर आजिजीचे भाव घेऊन भय्या म्हणाला. केळी न घेताच जगन पुढे निघाला. कोकणात भय्या? भलतचं की. इतक्यात त्याच्या पाठीवर जोराची थाप पडली. जगनने वळून बघितलं. कडक पांढरा शुभ्र लांब हाताचा सदरा, काळी पॅंट, डोळ्यावर गॉगल, गळ्यात सोन्याची चेन, हातात मोबाईल आणि कपाळावर उभा टिळा. जगन बघतच राहिला. समोरचा हसला पण जगनला काहीच बोध होईना. समोरच्याने गॉगल काढला मात्र.. "मेल्या, बाबल्या तू?? ह्या काय आणि?? हाटेल सोडून हय खय भटाकतस?" बाबल्या सरमळकर जगनचा बालमित्र. जगन मुंबईला गेला पण बाबल्या मात्र गावातच बापाशीचं उपाहारगृह चालवत राहिला. "सांगतय तुका, झाली खरेदी?" "थांब जरा, आणखी घेवचा हा सामान." "सोड रे, आता सगळा गावता बोक्याच्या दुकानार." दुकानाचा मालक मांजरेकर, पण बोक्याचं दुकान म्हणूनच त्याला लोकं ओळखायचे. "बोको आसा काय रे आजून?" चालता चालता जगनने विचारलं. "आसा तर, तो काय इतक्या लवकर जातलो? पोरा सांभाळतत दुकान. आता सगळा गावता थयसर, अगदी डेकोरशनच्या सामायनापासून खायच्या वस्तूंपर्यंत. काय म्हणतत ता डिपारमेंटल स्टोअर!" बाबल्याने माहिती पुरवली आणि पल्सारला किक मारली. जगन त्याच्या मागे बसला. जाता जाता बाबल्याने माहिती पुरवली की तो आता 'इस्टेट एजंट' झाला आहे. जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून त्याला 'थोडंफार' कमिशन मिळत होतं. त्याच्या बोलण्यातून जगनला समजलं की कोकणात जमिनीला अगदी सोन्याचा भाव मिळत होता. म्हणजे अगदी "हायवे टच" जमीन असेल तर एकरी करोड वगैरे. आणि दिल्ली पंजाब बाजूची माणसं पण जमिनी खरेदी करत होती. "हे तुमचे पिक्चरवाले हिरो-हिरायनी, सगळी लिडर लोका जमिनी घेतत पडान, आसस खय" "आणि आमची माणसा विकतत?" "पैसो गावता मा रे. नायतर आसा काय हयसर? बागायतीत दम नाय, शेतीत राम नाय, आणि माणसा खय गावतत रे कामाक? आंबो म्हणजे लहरी पीक. त्यापेक्षा ह्या बरा, जमीन इकली आणि पैसो गाठीक मारलो" "अरे पण उद्या तो पैसो सरलो तर मगे आपल्याच जमिनीत मग नोकरी करतले नाय" "जगन्या, मेल्या तुम्ही मुंबयकरा थयसर मजा करतास. हयल्यांनी पण केली तर काय रे? अरे कोकणाचो इकास होताहा, त्याका नावा ठेव नकात" इतक्यात गाडी गावात शिरली. थोडसं आत गेल्यावर बाबल्याने त्याच्या उपाहारगृहाच्या बाहेर गाडी लावली. नेहमीप्रमाणे चार-पाच माणसं बसली होतीच. "भट, दोन पेशल आण. आपलो दोस्त इलो" जगनची प्रश्नार्थक मुद्रा बघून बाबल्याने खुलासा केला " अरे मी आसतय माझ्या झेंगटात. बापाशीचा हाटेल चलवतलो कोण? शेवटी हो एक राजस्थानी गावलो, तोच चालवता हाटेल आणि माका म्हयन्याचे काय ते देता हाडुन. हयसर कप विसळक पण कोण गावणा नाय, मग त्याचोच एक गाववालो बोलवल्यान. हयसरच रवतत, जेवतत." चहा आला. घुटके घेत जगन सगळीकडे न्याहाळू लागला. उपाहारगृहाच्या बाहेर गुटख्याची बरीच पाकिटं पडली होती. बाबल्याच्या उपाहारगृहातच गुटख्याच्या माळा सोडल्या होत्या. इतक्यात दोन पोरसवदा तरुण आले आणि गुटख्याच्या पुड्या घेवून गेले. जगनच्या अंगावर शहारा आला. आज जर बाबल्याचा बाप असता तर... एक उसासा टाकून जगन उठला, पैसे देण्यासाठी हात खिशात घातला. "अरे रवांदे, मी काय माडीयेचा घर नाय बांदाचय तुझ्या पैशान. आसय मा दोन-चार दिवस? येतय भेटाक. आता जरा वाडीक जातय. दिल्लीची पार्टी इलिहा, त्याका बंगलो बांधूक जमिन बघूची हा." बाबल्या भुर्रकन बाईकवरून गेला. जगनने आपलं सामान घेतलं आणि घरच्या दिशेने निघाला. आजूबाजूच्या घरांतून मोठमोठ्याने हिंदी गाणी लावलेली ऐकू येत होती. सगळ्याच घरांवर डिश दिसत होत्या. मधे भेटणार्‍या पोरांच्या हातात, कानावर मोबाईल दिसत होते. गाव बदलत होतं खरं. चालत चालत जगन घराकडे आला. शेजारच्या घरातून एक लहान मुलगा डोकावला आणि त्याला बघून "मम्मी, कोण इला बघ" असं म्हणत घरात पळाला. 'हो सुरग्याचो झिल दिसताहा,' जगन मनात म्हणाला. सुरेश त्याचा चुलत भाऊ. शेजारीच त्यांच घर होतं. तो शाळामास्तर होता. झालच तर सामायिक बागायत तोच कसत होता आणि 'यंदा सुपारीवर रोग पडला, सबब उत्पन्न काही हाती आले नाही' अशी पत्रं पण न चुकता दरवर्षी सगळ्या भावांना पाठवत होता. "भावजी, ईलास? बरां झाला. म्हटला येवक जमताहा काय नाय" सुरेशची बायको गाउनला हात पुसत बाहेर आली. "आणि एकटेच इलास? घरकारीण, मुला नाय येवक?" "नाय, मुलांका सुट्टी नाय मा" जगन कसनुसा हसला. खरतर बायकोने आपल्याबरोबर गावी यावं म्हणून त्याने कितीतरी मनधरणी केली होती. पण 'मला गावात करमत नाही, मी येणार नाही' असं तिने निक्षून सांगितलं होतं. तिचा जन्मच मुळी मुंबईचा, त्यामुळे तिला गावची ओढ नव्हतीच. "दीड दिवसाचो गणपती, सवड काढुक होयी. काय नाय तरी नैवेद दाखवक होयो मा? आम्ही आसोच पण घरातली माणसा इली तर बरा." म्हणजे नैवेद्य करावा लागणार ही जबाबदारी सुरेशच्या बायकोला नको होती तर. "तुम्ही आसास म्हणान तर आमचो गणपती पार पडता," आपला स्वर शक्यतो मधाळ करत जगन म्हणाला. बोलता बोलता त्याने पिशवी उघडून आणलेल्या भेटी बाहेर काढल्या. आपल्यासाठी आणलेली साडी, मुलासाठी कपडे आणि खाऊ बघून सुरेशच्या बायकोचा चेहरा निवळला. "न्हावन घेवा, चा टाकतय तवसर." "चा नको गे, बाबल्यान पाजल्यान. विहीरीर जातय न्हावक," असं म्हणून जगन कपडे घेऊन घरामागच्या विहिरीवर गेला. अंगावर थंड पाणी घेतल्यावर त्याला बरं वाटलं. आंघोळ झाल्यावर जगन आपल्या घरात गेला. प्रत्येक खोली उघडून आत फिरला. सुरेशने घर धुवून पुसून घेतलं होतं. जगनला गलबलून आलं. याच घरात तो लहानाचा मोठा झाला होता. अगदी मुंबईला जाईपर्यंतच्या सगळ्या आठवणींचा पट त्याच्या डोळयांसमोरून सरकून गेला. एवढं मोठं घर, आणि आपण साला तिकडे टिचभर खुराड्यात राहतो. जगन शहारला आणि परत सुरेशच्या घरी गेला. दुपारी जेवून थोडी झोप काढून जगन उठला. चहा पिऊन होतो तोवर सुरेश बाहेरून आला. दोघांच्या गप्पा होताहेत तोवर मांजरेकराचा बाळा आला. "मुंबयकर कधी ईले?" "सकाळी ईलय रे. कसो आसय?" "चल्लाहा. पावस येवच्या अगोदर गणपती हाडुया नाय?" जगन, सुरेश, त्याचा मुलगा - हृतिक आणि बाळा गणपती आणायला निघाले. शेतातल्या मेरेवरून चालत टेंबावर आले आणि खालच्या अंगाने उतरून धुमकाच्या घरी पोचले. बरेच गणपती तयार होते. हृतिकने एका गणपतीवरचा कागद दूर केला. "काकानु, हो आमचो गणपती" धुमकाने गणपती छान बनवला होता. पुढ्यात एक ऊंदीर ठेवून त्याने सुरेशच्या हातातला पंचा मूर्तीभोवती गुंडाळला. जगनने धुमकाच्या हातात नारळ दिला. "किती झाले रे मूर्तीचे?? "काय द्या झाला. आम्ही कधी सांगणो नाय, तुमका काय ठीक दिसात ता द्या." जगनने सुरेशकडे पाहिलं, त्याने तीन बोटं दाखवली. जगनने तीन हजार रुपये काढून धुमकाकडे दिले. "आता पुढच्या वर्सापासून मार्ग्याकडे" सुरेश म्हणाला. "म्हणजे रे?" "हो काय करुचो नाय म्हणताहा." "असा काय रे" "काय करुचा? फकस्त गणपतीचे, कृष्णाचे आणि नागोबाचे मूर्ती करून भागणा नाय रे. वाडवडिल करीत, आम्ही आतापावतर सांभाळला. पण पोटाचा काय? मी चाललंय गोयाक, काजू फॅक्टरीत कामाक लागतय." बोलता बोलता धुमकाचे डोळे पाणावले. जगनला पण भरून आलं. बाळाच्या डोक्यावर गणपती देवून चौघे निघाले. हृतिक उत्साहात "गणपती बाप्पा मोरया!" ओरडत चालला होता. घरी गणपती आल्यावर सुरेशच्या बायकोने गणपतीला ओवाळले, पायावर पाणी घातले आणि दोघांनी मूर्ती घरात आणून ठेवली. "अर्र, सकाळी बाबलो भेटलो आणि त्या नादात सामान हाडुचा रवला. आता जावन हाडु काय?" जगनने विचारले. "ह्या बघ, सगळा हाडलय," एक पिशवी पुढे करत सुरेश म्हणाला. त्याने सगळं काही आणलेलं दिसत होतं. जगनने पिशवी रिकामी केली. खाली बिलही होतं. जगनने बिल खिशात ठेवलं आणि सुरेशकडे पाहिलं. त्याने मान दुसरीकडे फिरवली. "चल रे हृतिक, माटवी बांधाया." मग जगन आणि हृतिकने मिळून माटवी सजवली. सकाळी बाजारात घेतलेल्या वस्तू, विजेच्या माळांची तोरणं बांधून मस्त सजावट केली. "भट किती वाजता येतलो पूजेक?" "सात तरी वाजतीत." "गुंडुभटच मा?" "नाय, त्याचो झिल. शास्त्रोक्त शिकान इलोहा सगळा. चांगली सांगता पूजा. गुंडु मेलो काय सांगा काय्येक कळा नाय. मधीच मारुतीस्तोत्र पण म्हणी गणपतीच्या पूजेक." "म्हणजे बापाशीची गादी चलवता तर झिल. बरा वाटला. नायतर बाबलो." बोलता बोलता जगन थांबला. त्याची पण खरतर इच्छा नव्हती घर सोडून मुंबईला जाण्याची, पण त्याच्या वडिलांनी त्याला पाठवलेच होते. एकदा मुंबईला गेल्यावर मग तो परत फिरकूच शकला नव्हता. त्याने मोठा सुस्कारा सोडला. "पिठी-भात खावन निजाया तर, सकाळी उठाचा आसा." सुरेश उठला. सकाळी जगन आणि सुरेशने गणपती माटवीत ठेवला. इतक्यात गुंडुभटाचा मुलगा आला. पटापट पूजा सांगितली. जगनने मनोभावे नमस्कार केला. अगदी प्रसन्न वाटत होतं त्याला. गणपतीकडे बघताना त्याला जाणवलं की पूजा केल्यावर मूर्तीला एक वेगळचं तेज आलं आहे. दुपारी एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवून मग घरातल्या चौघांनी आरती केली. जेवताना जगनने वहिनीच्या स्वयंपाकाची तारीफ केली. लगेच वहिनीने त्याला आग्रहाने दोन मोदक आणखी वाढले. जेवण भलतचं अंगावर आलं म्हणून जगन जरासा लवंडला. डोळा लागतो न लागतो तोच त्याला बाबल्याची हाक ऐकू आली. "आसय मा रे?" "आज खय जातलय? येवक लाग." बाबल्याने येऊन गणपतीला नमस्कार केला आणि जगनच्या शेजारी येऊन बसला. "बोल जगन, कसा चल्लाहा तुझा? झिल काय करता तुझो?" "चल्लाहा, गाडो ओढतय. महागाई, शिक्षणाचो वाढतो खर्च, जागेचा कर्ज ह्या सगळ्याक बरोबर घेवनच चल्लय पुढे." "खरा तुझा, शहरातले खर्च मोठेच." काही क्षण शांततेत गेले. मग बाबल्या उगाचच खाकरला. "मी काय म्हणतय, तुमची ती जमीन आसा नाय वरच्या कापात..." "तिचा काय?" "नाय म्हणजे जमीन पडूनच आसा म्हणान सांगतय," जगनला एव्हाना बाबल्याच्या बोलण्याचा अंदाज येऊ लागला होता. "हायवेपासून जवळ आसा म्हणान सुचवतय, इकून टाकीनस ती.." "....." "गोयाची पार्टी आसा, त्याका घर बांधुचा हा. पिकनिक करुक येतत मा ते रवतले थयसर. गोव्यात हाटेलांचे रेट जास्त आसत. हयसर रवला की खर्च कमी अणि दोन तासात गोव्यात, कसां?" जगनच्या डोक्यात संतापाची तिडीक गेली. "अरे जमिन आमच्या वाडवडिलांची. आमका सांभाळूक म्हणान त्यानी ठेयल्यांनी आणि आमीच त्याची वासलात लावची? माका पटणा नाय. आणि इकता कोणाक तर भायल्यांका. रे आमी मुंबयत आज भायले झालो आणि आता हयसरसून पण? बाबल्या, अरे तुका समाजणा नाय रे, तुका आज पैसो दिसता पण नंतर हे भायले डोक्यार बसले की मग काय करतलस? ता काय नाय, माका जमीन इकाची नाय" जगनने निक्षून सांगितलं. बाबल्याने पण पुढे विषय वाढवला नाही. इकडचं तिकडचं बोलून, आपला गणपती बघायला येण्याचं जगनला बजावून तो निघून गेला. जगन पुन्हा चटईवर पडला. पण त्याला आता झोपच येईना. काय करताहेत ही माणसं? थोड्याशा पैशासाठी आपलं अस्तित्व विकतायत? आणि पैशाचं करणार काय? शिक्षण नाही, अंगात आळशीपणा मुरलेला. मग पैसा येऊन त्याची विल्हेवाट लागायला वेळ लागणार नाही. विचार करता करता त्याला झोप लागली. झोपेत त्याला स्वप्न पडलं. त्याची जमीन आणि घर सकाळी बाजारात भेटलेल्या भय्याने विकत घेतलं होतं आणि गावच्या वेशीवर त्याने मोठ्ठा फलक लावला होता "आवा, कोकणवा हमार है बा!" जगन दचकून जागा झाला. रात्री आवाठात सगळ्यांकडे आरतीसाठी सुरेशबरोबर निघाला तेव्हा त्याने बाबल्याबरोबर झालेलं बोलणं सांगितलं. सुरेशला त्याचा निर्णय आवडलेला दिसत नव्हता. पण तो काही बोलला नाही. आरतीला मजा आली. गावच्या टिपिकल चालींवर आरत्या म्हणताना जगन सगळं काही विसरला. प्रत्येक घरात ओळखीच्या माणसांना भेटून बरं वाटलं. पाटकरांच्या माईने त्याला बसवून गुळाची करंजी खायला दिली आणि त्याच्या चेहर्‍यावरून मायेने हात फिरवला तेव्हा जगनला भडभडून आलं. दुसर्‍या दिवशी चार वाजता जगनच्या घरी भजन करायचं ठरलं. घरी परतल्यावर सुरेशने बायकोच्या कानावर भजनाची बातमी घातली. "मग उद्या बटाटेवडे तळुक होये तर." "कशाक गे, उसळ नाय करणास?" जगन आश्चर्याने विचारता झाला. "उसळ? ते दिवस गेले भावजी. दोन वर्सापूर्वी उसळ केलय ती गायरेत टाकून देवची लागली. आता ह्यांका वडे, सामोसे होयेत" जगनला काय बोलावे तेच कळेना. त्याला आठवलं, तो लहान असताना आवाठातल्या तेराही घरात भजनाला काळ्या वाटाण्याची उसळ बनायची आणि पानाच्या खोलपीत वाढलेली उसळ सगळे अगदी मिटक्या मारत खायचे. सगळचं बदललं, आता माणसाची चव तरी कशी तीच राहील? दुसर्‍या दिवशी चार वाजता भजन आलं. आवाठातलेच सगळे जण मिळून भजन करायचे. वाद्यं आणि बुवा सुतारांच्या घरचे, त्यामुळे त्यांची वट असायची. मधु सुतार पेटीवर बसला आणि त्याने भजनाला सुरुवात केली. मधु आता थकला होता आणि त्याचे सगळे दातही पडले होते. त्यामुळे शब्द स्पष्ट येत नव्हते, पण इतरांना पाठ असल्याने सगळे सांभाळून घेत होते. दोन अभंग झाले आणि सगळे संजूला - मधुच्या पुतण्याला - आग्रह करु लागले. त्यानेही जास्त आढेवेढे न घेता भजन सुरू केलं. "राधा गवळण पाण्या निघाली वाजती पैंजण,रुणझुण रुणझुण" चाल ऐकताच जगन चमकला. चक्क हिंदी गाण्याच्या चालीवर भजन बेतलं होतं. जगनचा उत्साह पार मावळला. सगळे अगदी उत्साहात टाळ-झांजा वाजवत साथ देत होते. जगन मात्र यांत्रिकपणे साथ देत होता. भजन संपलं. सगळ्यांनी वड्यांचा फडशा पाडला. प्लास्टिकच्या कपातून दिलेला चहा पिऊन सगळे निघाले आणि गुंडुभटाचा मुलगा उत्तरपूजा करण्यासाठी आत शिरला. उत्तरपूजा करताना मात्र जगनला भरून आलं. तो लहान असताना गणपती जाणार म्हणून रडत बसायचा. अगदी त्याच्या वडिलांचे देखील डोळे भरून यायचे. भटाने पूजा आटोपली आणि "पुनरागमनायच" म्हणून जगनने गणपतीच्या मूर्तीवर तांदूळ घातले. "चला, गार्‍हाणा घालुक" सुरेशने बायकोला आणि मुलाला आवाज दिला. सगळे हात जोडून उभे राहिले. भटाने सुरु केलं "ॐ गं गणपतये नमः| सालाबादप्रमाणे ह्या हळदणकर कुटुंबियांनी तुमची दीड दिवस मनोभावे सेवा केलेली आहे. ती तुम्ही गोड मानून घ्या. त्याचप्रमाणे ह्या सेवेत त्यांच्याकडून काही चूक राहून गेली असेल तर त्यांना क्षमा करा. ह्या कुटुंबातल्या सर्वांना चांगलं आरोग्य लाभू दे. जो काही नोकरी - व्यवसाय ते करत असतील त्यात त्यांना यश मिळू दे. मुला-बाळांचं शिक्षण व्यवस्थित होऊ दे. ह्या कुटंबावर आपली कृपादृष्टी राहू दे. पुढच्या वर्षीदेखील आपली अशीच सेवा-चाकरी ह्या कुटुंबाकडून घडू दे. शुभं भवतु!" "होय रे महाराजा," चौघांनी मनोभावे हात जोडले. "आणि कोणाला काय सांगायचे आहे?" "नाय ..." सुरेशचे बोलणे पूर्ण व्हायच्या आतच जगन बोलू लागला. "देवा म्हाराज्या, तू बुद्धिदाता आसय, तुझी दरवर्सा भक्तीभावान पूजा करणार्‍या ह्या कोकणातल्या मानसांका जरा बुद्धि दे. त्यांका आपला भला-बुरा काय ता कळांदे. भायली माणसा हयसर येवन आपला बस्तान बसवतत आणि आमची माणसा त्यांका चूड दाखवन घरात घेतहत. उद्या हेच भायले आमच्या उरावर बसतले आणि आमची माणसा आमच्याच मातीत उपरी जातली. पण ह्यांका आज समाजणा नाय. आणि आमच्या माणसांच्या अंगातलो आळस आधी दूर कर. चाय खात फकांडे मारुचो ह्यांचो आवडतो उद्योग. डोक्या तल्लख आसा पण अंगमेहनत करूक नको. आमची पोरां आता व्यसनां करुक लागलीहत, त्यांका सुबुद्धी दे. ह्या कोकणातल्या पुढार्‍यांका, कोकणाच्या नावाखाली आपलो विकास करुची चटक लागलिहा. आमच्या वाडवडिलांनी वाढवलेल्या बागायतींचो, डोंगरांचो सत्यानाश करतले हे. विघ्नहर्त्या, तूच ह्या सगळा अरिष्ट दूर कर.." बोलता बोलता जगनाचा गळा भरून आला. ओठ थरथरू लागले. डोळ्यापुढली गणपतीची मूर्ती धूसर दिसू लागली. जगनने गणपतीसमोर लोटांगण घातलं. बाकी सगळे त्याच्याकडे अचंबित होऊन बघत राहिले. समयीच्या मंद प्रकाशात गणपतीची मूर्ती "तथास्तु" आशीर्वाद देत होती!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा