शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

खांबडवाडी दहीहंडी उत्सव...

#लांजागोळवशी
#खांबडवाडी
#दहीहंडी2017
       माझ्या गोळवशी गावातील खांबडवाडीमध्ये दहीहंडी पारंपारिक पद्धतीने व ढोलताशांच्या गजरात साजरी केले जाते.गोळवशी खांबडवाडीत साजऱ्या होणाऱ्या या दहीहंडी उत्सवाला जवळजवळ 50 वर्षाहुन अधिक काळ लोटला आहे तरीसुद्धा दहीहंडीचे स्वरूप आजतगायत जसेच्यातसे टिकून आहे.गोकुळाष्टमीच्या दिवशी वाडीतील ग्रामस्थ श्री.प्रवीण शिर्के यांच्या घरी(देवाचा मांड) एकत्र येतात.सार्वजनिक पद्धतीने इथे कृष्णदेवाची पूजा केली जाते व रात्री बारा वाजता नंदलालाला पाळण्यात घालून पाळणागीते म्हटली जातात.व नंतर विधीवत पूजन करून आरती केली जाते.व रात्री भजने करून देवासमोर जागरण केले जाते.दहीकाल्याच्या दिवशी सर्व वाडीतील बाळगोपाळ एकत्र येऊन देवाची आरती करतात व नवसाला पावन झालेल्या हंड्या फोडण्यासाठी सज्ज होतात.
   दरवर्षी वाडीच्या एकूण 2 हंड्या आणि नवस पूर्ण होऊन येणाऱ्या हंड्या अशा 5-6 हंड्या लहान उंचीवर बांधून फोडल्या जातात.या हंड्या फोडताना सुद्धा भजनाची वारकरी पद्धती प्रमाणे दिंडी काढली जाते.नाचत भजने गात या हंड्या लहानथोरांकडून फोडल्या जातात.संस्कृती,परंपरा आणि सण याचा योग्य मिलाफ इथे पाहायला मिळतो.पाण्यासाठी येथील प्रत्येक घराच्या बाहेर पिंपे ठेवलेली असतात त्यामुळे पाण्याचा अल्प वापर केला जातो.कार्यक्रम संपल्यानंतर आलेल्या भाविकांना प्रसाद वाटप केला जातो.
     खांबडवाडीच्या या दहीहंडी सोबत आम्हां साऱ्या मित्रांच्या अनंत आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत.दहीहंडीच्या दिवशी वाडीतील दिवंगत हवालदार शिर्के आम्हा सर्व लहान मुलांना लाठीकाठीचे हात दाखवायचे तसेच शाळेतील भालबर गुरुजीसुद्धा न चुकता हजर असायचे तीसुद्धा आठवण मनात कायमची घर करून आहे.लहानपणापासूनच वाडीतच दहीहंडी काय असते त्याचे बाळकडू मिळाले.चौथ्या थरावर जाऊन कितीतरी वेळा पडलो असेन पण परत उठून हंडी फोडली आहे.कोणतेही प्रशिक्षणाची गरजच नाही.कारण आम्ही धोका पत्करत नाही.परंपरा काय असते,सण काय असतात, आपली माणसे कशी असतात,एकजूट काय असते असे असंख्य संस्कार याच खांबडवाडीतुन आम्हां साऱ्यांना घडवत गेले.लांजा तालुक्यातील गोळवशी गावातील हि खांबडवाडी नवरात्रोत्सव,गणेशोस्तव,दहीहंडी अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांमुळे तालुक्यात प्रसिद्ध आहे.लांजा तालुक्यात गोळवशी गावाला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून याच वाडीमुळे ओळखले जाते.
  असेच उभे राहू आम्ही
  सांगू गाथा खांबडवाडीची
  गौरवशाली वाटचाल
  आमुच्या परंपरेची
  लाख संकटे आली
  तरी निधड्या छातीने झेलावयाची
  हाक हि नव्या पिढीची
  नवसंकल्पांची,नवनिर्मितेची ...  
किरण प्रकाश भालेकर
Bhalekar117.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा