शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७

बेशिस्त पर्यटन

*बेशिस्त पर्यटन!!*

परवा परत दोघे युवक आंबोलीत दरीत पडून मेले. नेहमीप्रमाणें आमचा बाबल आल्मेडा, एडव्हेंचर संस्थांचे स्वयंसेवक त्यांचे मृतदेह शोधण्यासाठी जीव धोक्यात घालून दरीत उतरलेत. रात्रभर शोध मोहिमेत आहेत. अधिकारी मोहिमेच्या वेळी हॉटेलमध्ये मजा करताहेत, म्हणून सगळ्यांची टीकेची झोड उठतेय.

पण, कालच्या घटनेचा जो व्हिडीओ व्हायरल झाला, तो पाहता खरंच वाटतं, या हलकट लोकांसाठी रात्रभर पावसात, धुक्यात, कडाक्याच्या थंडीत या सगळ्यांनी आपला जीव धोक्यात घालायची काय गरज आहे? ट्रेकिंग करताना एखादा ट्रेकर चुकून पडला,तर त्याला निदान कर्तव्यभावनेची बाजू तरी उदात्त असली असती.  

हे वाचताना असंवेदनशील वाटेल, पण हेच कठोर सत्य आहे. हे मेलेत यांच्या कर्मामुळे, पण ह्यांचे मृतदेह आणायला आमचे जे स्वयंसेवक दरीखोऱ्यात उतरून जिवावरची थरारक जोखीम उठवतात, त्यांच्यापैकी एखाद्याच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर यांच्या कुटुंबियांना कसल्या भविष्याचे संरक्षक कवच आहे हो? यांची माणुसकी काय भावाने विकली जाईल या दुनियदारीत? 

हि मंडळी कशा प्रकारे जीव धोक्यात घालतात, यावर यापूर्वीच सिंधुदुर्ग ऍडव्हेन्चर डॉ कमलेश चव्हाण आणि अभिजित चव्हाण यांच्या आंबोलीतल्या शोधमोहिमेतल्या थरारावर तरुण भारतच्या श्री शेखर सामंत यांनी प्रकाश टाकलेला होता. असे अनेक जिवावरचे थरार अशी अनेक स्वयंसेवी वृत्तीची मंडळी सतत घेत आहेत. कालही, या मृतदेहांच्या शोधासाठी स्थानिकांसोबत कोल्हापूर, सांगली टीमचे सदस्य सहा हजार फूट खोल दरीत उतरलेत. दाट धुके, मुसळधार पाऊस आणि श्वापदेसमृध्द जंगलमय भाग यात त्यांनी कालची रात्र जंगलातच कशी घालवली असेल, ते देवालाच ठाऊक.

अलीकडे निसर्गसुंदर आंबोलीत अपघात आणि हाणामाऱ्याचे प्रमाण खूप वाढलंय. अंगावरच्या कपड्याचीही शुद्ध नसलेल्या आणि निसर्ग-पर्यटन नव्हे, तर *झिंगाट* पर्यटन करायला आलेल्या या बहुतांशी बाहेरच्या राज्यातील आणि जिल्ह्यातील  बेपर्वा तरुणांमुळे सिंधुदुर्गचे पर्यटन बदनाम होते आहे, याची आपल्यालाच दखल घ्यायला हवी. कौटुंबिक पर्यटकांची तर आंबोलीला जाऊन मजा करायची हिंमतच नाही.

दुर्दैव, म्हणजे प्रत्येक अपघातानंतर पोलीस दल आणि मुख्यत्वे *आपत्ती व्यवस्थापन* यावर टीकेची झोड उठवली जाते. सिंधुदुर्ग आपत्ती व्यवस्थापनात अनेक घसघशीत त्रुटी आहेतच, पण अगदी परिपूर्ण असले असते, तरी या असल्या नादान पर्यटकांसमोर काय कपाळ बडवणार होते?

सुरक्षा.. सुरक्षा म्हणजे नेमकं काय करायचं हो? काय असल्या प्रत्येक पर्यटकाबरोबर एक पोलीस लावायचा? आज हे कावळेसादवर xx मस्ती करून मेले, उद्या नांगरतास वर करतील. अख्ख्या सह्याद्रीच्या कडेकपारीवर पोलीस दल आणि आपत्ती व्यवस्थापन दल पेरायचे का? पर्यटकांची काहीच जबाबदारी नाही का?

दुसरी गोष्ट, जर अशा शासकीय यंत्रणांवर बोट दाखवून बोंबलायचेच असेल, तर स्टेट एक्सइजच्या नावाने का बोंबलत नाही?

एखाद्या हॉटेलमध्ये कोणाकडे रिकामी बाटली मिळाली, तरी त्यातले थेंब हुंगुन हॉटेल मालकावर कारवाईचा बडगा उगारणारे हे *दक्ष* खाते सिंधुदुर्गात रात्रंदिवस उघड्या माळरानांवर चालणाऱ्या दारुपार्ट्यांवर कारवाई का करत नाही? भर रस्त्यावर दारूच्या बाटल्या हातात घेऊन नंगानाच करणाऱ्या या झिंगाट कार्ट्यांवर कठोर कारवाई  का नाही होऊ शकत? अर्थात, कठोर कारवाई म्हणतोय मी, तोडपाणी नाही!

असल्या नादान आणि हरामखोर पर्यटकांमुळे संपूर्ण आंबोली बदनाम होत आहे. पर्यटन बदनाम होत आहे.  बिचारे बाबल आल्मेडा आणि सगळे सहकारी सगळ्या सिस्टीमला भलेही शिव्या घालतात, नाराज होतात, उद्विग्न होतात, पण संकटाच्या वेळी सगळं बाजूला ठेऊन तिथे धावून जातात आणि आपला जीव धोक्यात घालतात. फक्त माणुसकीच्या दृष्टीने!! दरीत रात्र रात्र फिरतात, जंगली श्वापदांचाही धोका पत्करतात.

प्रश्न पडतो, कोणासाठी? या असल्या मरायचीच लायकी असलेल्या झिंगाट पर्यटकांसाठी, कि आपत्ती व्यावस्थापनाच्या इज्जतीसाठी? यांच्या असीम माणुसकीची थोडीतरी किंमत राखावी !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा