शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७

स्वा.सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज

स्वातंत्र्यवीर सावरकरांची काव्यप्रतिभा सर्वश्रुत आहेच. पण त्यांनी रचलेली छत्रपती शिवाजी महाराजांची आरती मला जास्त भावते. आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक काव्य प्रकार हाताळलेल्या तात्यारावांनी एकमेव आरती रचली ती देखील  शिवरायांची. याचे एकमेव कारण म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराज" हेच या राष्ट्रवादाचे आणि स्वातंत्र्य प्रेरतेचे प्रतीक होते आणि राहतील. सावरकरांची राष्ट्रभक्ती, अध्यात्माचा अभ्यास आणि राष्ट्रचेतनेचा ध्यास या ही रचनेतून अधोरेखित होतो.
जय देव जय देव जय जय शिवराया
या या अनन्य शरणा आर्यां ताराया
या शब्दांतच प्रत्येक घरात शिवरायांची स्फूर्ती पोहोचून त्यांच्या पराक्रमानेच ही भूमी स्वातंत्र्य प्राप्त करून सुराज्याकडे वाटचाल करेल तसेच शिवाप्रभूंचे स्मरण हेच या देशाचे तारणहार आहे अशी आशा कवीला वाटते
आर्यांच्या देशावर म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सद्गदिता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदून तव कर्ण न का गेला
वर वर पाहता या कडव्यामध्ये सावरकर शिवरायांना आळवताना दिसतात. पण या शब्दात तत्कालीन सामाजिक परिस्थिती लोकांसमोर मांडताना स्वातंत्र्यवीर समाजाच्या निष्क्रियते वरही प्रहार करताना दिसतात. शिवकाळातील म्लेंच्छांचे म्हणजेच मुस्लिमांचे आक्रमण आणि सावरकरांच्या काळातील ब्रिटिशांचे वाढते राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक आक्रमण याची तुलना करताना सावरकर मातृभूमीच्या आर्त हाकेला प्रतिसाद देण्यासाठी जनसमूहाला आवाहन करत आहेत.
श्री जगदंबा जी स्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुन जी रघूवर संरक्षी
ती पुता भू माता म्लेंच्छांनी छळता
तुज वीण शिवराया तिज कोण दुजा त्राता
या कडव्यात मात्र सावरकरांचा धर्माभिमान दिसून येतो. श्री जगदंबेने राक्षसांचा संहार का केला ? श्रीरामांनी रावण का मारला ? शिवरायांच्या स्वराज्य साधनेचे मूळ काय ? याचा विचार करायला लावून सावरकर समाजाला हिंदू धर्माचे संरक्षण आणि संवर्धन करून राष्ट्रोद्धाराला प्रेरीत करतात. अर्थात सावरकरांनी भविष्यात मांडलेली हिंदुत्वाची म्हणजेच राष्ट्रीयत्वाची संकल्पना येथे अपेक्षित आहे हे सांगणे न लगे.
त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधू परित्रणा या दुष्कृती नाशा या
भगवन भगवतगीता सार्थ करा या या
शेवटच्या कडव्यातही सावरकर शिवरायांच्याच प्रेरणेला आवाहन करून अध्यात्मिक बळाने पण पराक्रम करूनच महाभारता प्रमाणे या देशाचा उद्धार व्हावा अशी प्रार्थना करतात.
आज परवशता नसली तरी अनेक संरक्षणात्मक आणि अंतर्गत आव्हाने आहेत. स्वराज्याचे सुराज्य होणे बाकी आहे. देशाची अंतःप्रेरणा जागृत राहणे गरजेचे आहे. त्या साठी शिवराय हेच तारणहार आहेत यात शंका नसावी आणि त्यांच्या कार्याचे सतत स्मरण राहावे या साठी या आरती इतके सुंदर काव्य नाही. कोणत्याही राष्ट्रपुरुषाला देव्हाऱ्यात बसवून आपल्या सोयीसाठी त्याची पूजा करत राहणे मला मान्य नाही पण या आरतीतून शिवराय हे एक विचार म्हणूनही पुढे येतात आणि त्याच साठी या आरतीचे पठण व्हावे असे मला वाटते. गणेशोत्सव जवळ येतोय या आरतीचा नाद घराघरात आणि सार्वजनिक मंडपात घुमवून राष्ट्रोद्धाराच्या दिशेने एक पाऊल पुढे पडावे हीच अपेक्षा.
©विद्याचरण भालचंद्र पुरंदरे
#इतिहासाच्या_पाऊलखुणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा