शनिवार, ३० मे, २०१५

कुठेतरी छानसे वाचलेले....

" सर, ताक घ्या ना. फक्त १० रुपये " फाटक्या कपड्यातील एक चिमुरडी माझ्या समोर ताकाचा ग्लास धरून उभी होती. तिच्याही तोंडी "सर" शब्द आला हे ऐकून वाईट वाटलं. कारण ठिकाण होतं रायगड किल्ला. ३५० पेक्षा जास्त वर्ष उनपावसाचा मारा सहन करूनही टिकून राहिलेल्या दगडी पायर्यांवर ही मुलगी हातात ताकाची एक किटली, चार ग्लास आणि ग्लास धुवायला बादली घेवून बसली होती. मी ताक घेतलं आणि पिताना तिच्याकडे पाहू लागलो. हाडाची काड झालेली. अजून दुधाचे दात पडले नव्हते आणि पोटाच खळग भरण्यासाठी काबाडकष्ट करू लागली होती. शिवाजी महाराज गेले आणि अश्या असंख्य कष्टकर्यांची रयाच गेली. रायगड भग्न होत गेला आणि ह्यांचं जीवन त्यापेक्षा जास्त भयाण झालं. त्यानंतर अनेक सत्ता आल्या-गेल्या. पण रायगडावर राहणाऱ्या ह्या कष्टाळू लोकांचे कपडे जास्त फाटत गेले. एकेकाळी ह्या रायगडावर आरोळी उठत असे, " चल मर्दा, उपस तलवार. शत्रू कोकणात उतरतोय. आमची शेती जळेल अन आया-बहिणीची अब्रूबी शिल्लक रहायची नाही." मग सपासप तलवारी तळपू लागायच्या. " जय जिजाउ , जय शिवराय ...हर हर महादेव ....यळकोट यळकोट जय मल्हार" सगळे रांगडे गडी शत्रूवर तुटून पडायचे. कांदा भाकर खाणारे मुठभर मावळे दहा हजार फौजेवर काही कळायच्या आधीच हल्ला करायचे. शत्रू तोफेत गोळे भरायला निघायाचा, तोवर मावळ्यांनी अनेकांच्या खांडोळ्या केलेल्या असायच्या. शत्रूच नाही तर महापराक्रम गाजवलेली ती क्रूर तोफसुध्धा शरण यायची. मावळे एका हातात तलवार, आणि एका हातात मृत्यू घेवून फिरत...फक्त महाराजांसाठी!! "सर, अजून एक ताक घ्या ना, फक्त दहा रुपये" मी भानावर आलो. इतिहास इतिहासजमा झाला आणि वर्तमानात उरली दिवसभर रायगडावर ताक विकत फिरणारी ही कन्या. एक ग्लास ताक पिवून झालं होतं. तरीही अस वाटलं आणखी एक ग्लास पिवूया. कारण त्याबदल्यात तिला जे पैसे द्यावे लागतील, तो फक्त तिचा" profit " नसेल तर कष्टाला दिलेली सलामीही ठरेल. हल्ली ह्या कष्टाला कोण सलामी देतं? सिनेस्टार्स, क्रिकेट खेळाडू, गायक आणि राजकारणी ह्यांना पद्म पुरस्कार मिळतात आणि दिवसभर उन्हात उभं राहून ताक विकणाऱ्या मुलीला मिळतात एका ग्लासामागे दहा रुपये. मी तिला विचारलं, "शाळेत जाते का ?" तिने उत्तर दिलं, "जातो की..आम्ही गडावरची सारी मुलं खाली पाचाडमध्ये शाळेत जातो." मी थक्क झालो. अंदाजे १५०० पायर्या उतरून- पुन्हा चढून ही मुले शाळेतही जात होती. रायगडाची उंची आहे 1,३५६ मीटर. पण ह्या इवल्याश्या पोरांची कर्तबगारी आहे आसमंताला भिडणारी. ती मोजायची तर मीटरमध्ये मोजता येत नाही. मीटर त्या शाळेत जाणार्या मुलांना मोजावे लागतात, जे school bus मधून शाळेत जातात-येतात... घरपोच!! इथे रायगडावरील आणि इतर गडांवरील मुले उरलेल्या वेळेत ताक, लिंबू सरबत विकून चार पैसे कमावतात. महाराजांनी चारी बाजूने आक्रमण होतं असूनही स्वराज्य आणलं ते अश्याच गड्यांच्या बळावर...हे जग चालतं ते अश्याच कष्टकर्यांच्या जोरावर .. --असाच एक वाचनात आलेला सुंदरसा लेख ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा